India’s squad for T20Is series against New Zealand announced : विराट कोहली ( Virat Kohli)चं कर्णधारपदाचं पर्व संपल्यानंतर टीम इंडिया नव्या आव्हानासाठी सज्ज होत आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) खांद्यावर आता टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी असणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-२० मालिकेपासून रोहित पर्व सुरू होत आहे आणि त्यासाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा बीसीसीआयनं मंगळवारी केली. याचसोबत बीसीसीआयनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या भारत अ संघाचीही निवड केली. बीसीसीआयनं जाहीर केलेल्या या संघावरून भारताचा महान फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) संतापला आहे आणि त्यानं थेट बीसीसीआय व निवड समितीला जाब विचारला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी निवडलेल्या संघातून विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्थी, शार्दूल ठाकूर यांना विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला NCA मध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला गेल्याचे समजते. तंदुरुस्तीच्या कारणामुळे त्याची संघात निवड झालेली नाही. चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड, कोलकाता नाइट रायडर्सचा वेंकटेश अय्यर, दिल्ली कॅपिटल्सचा आवेश खान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा हर्षल पटेल यांना संधी मिळाली आहे. युजवेंद्र चहलचे कमबॅक झाले असून आर अश्विनचे स्थान कायम आहे. आयपीएल २०२१ त पर्पल कॅपचा मानकरी हर्षल पटेल यालाही संधी मिळाली आहे, मोहम्मद सिराजही परतला आहे.
भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
हरभजन सिंग कोणासाठी भडकला?आणखी एका अव्वल दर्जाच्या खेळाडूला त्याच्या कामगिरीची पोचपावती मिळालेली नाही. मनदीप सिंगचा टीम इंडियासाठी सोडा साधा भारत अ संघासाठीही विचार केला गेला नाही. निवड समितीनं स्थानिक क्रिकेटचे विक्रम पाहायला हवेत, मग रणजी करंडक खेळवण्याचा अर्थ काय. मनदीपचे स्टॅट्स पाहा.