IND vs SL T20 ODI Series Schedule: भारत आणि श्रीलंका यांच्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये वन-डे आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. त्या दौऱ्याचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका २६ जुलैपासून सुरू होणार आहे, तर वन-डे मालिका १ ऑगस्टपासून खेळण्यात येणार आहे. टी-20 मालिका पल्लेकल येथे खेळवली जाईल, तर वनडे मालिकेतील तीनही सामने कोलंबोमध्ये खेळवले जातील. टीम इंडियाचा श्रीलंका दौरा हा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची पहिली परीक्षा असणार आहे.
T20-ODI मालिकेचे वेळापत्रक
- पहिला टी२० सामना - २६ जुलै - संध्याकाळी ७ वा.
- दुसरा टी२० सामना - २७ जुलै - संध्याकाळी ७ वा.
- तिसरा टी२० सामना - २९ जुलै - संध्याकाळी ७ वा.
- पहिला वनडे सामना - १ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.
- दुसरा वनडे सामना - ४ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.
- तिसरा वनडे सामना - ७ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.
विराट-रोहितला विश्रांती?
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होणार आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, विराट कोहली आणि रोहित शर्मा या दौऱ्यावर जाणार नाहीत. तसेच याशिवाय जसप्रीत बुमराहलाही विश्रांती देण्यात येऊ शकते. हार्दिक पांड्या टी-20 संघाचा कर्णधार असेल, तर केएल राहुलकडे वनडे संघाचे नेतृत्व सोपवले जाईल. पण अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
श्रीलंकेचा संघ पूर्वीसारखा तुल्यबळ नाही, पण आशिया चषकात त्यांनी केलेली कामगिरी साऱ्यांच्याच लक्षात आहे. टीम इंडियाने शेवटचा श्रीलंकेचा दौरा २०२१ मध्ये केला होता. त्यावेळी भारताने वनडे मालिका जिंकली होती, पण टी-२० मालिकेत भारताला १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता.
श्रीलंकेला शोधावा लागणार नवा कर्णधार
भारताच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वीच यजमान संघाचा कर्णधार वानेंदू हसरंगा याने कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी श्रीलंकेला नवा कर्णधार निवडावा लागणार आहे. श्रीलंकेचा संघही नव्या मुख्य प्रशिक्षकासह मैदानात उतरणार आहे. अनुभवी माजी सलामीवीर खेळाडू सनथ जयसूर्या याला या मालिकेसाठी श्रीलंकेचे अंतरिम प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.