दुबई : भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) टी-२० क्रमवारीत अष्टपैलूंमध्ये संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल अष्टपैलू ठरणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. अंतिम लढतीत अर्धशतक झळकावणारा हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांना बाद करीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या पांड्याला दोन स्थानांचा फायदा झाला आहे. यासह तो टी-२० अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत श्रीलंकेचा स्टार खेळाडू वानिंदु हसरंगा याच्यासह टी-२० अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत संयुक्तपणे अव्वल स्थानी आला. पांड्याने अंतिम लढतीत २० धावांत ३ बळी घेतले होते.
‘आयपीएल’मध्ये मुंंबईचा नवा कर्णधार म्हणून चाहत्यांच्या हुल्लडबाजीचा सामना केल्यानंतर पांड्याने टी-२० विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केली आहे. पांड्याने खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना गोलंदाजीतही प्रभावी कामगिरी केली. संघाला गरज असताना त्याने बळी मिळवले. त्याने स्पर्धेत १५० हून अधिक स्ट्राइक रेटने १४४ धावा केल्या आणि ११ बळी घेतले.
टी-२० विश्वचषकात सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह १२ स्थानांच्या प्रगतीसह १२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. २०२० नंतर ही त्याची सर्वोत्तम क्रमवारी आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या ॲन्रीच नाॅर्खिया सात स्थानांच्या फायद्यासह कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंडचा आदिल राशिद अग्रस्थानावर आहे. टी-२० अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल दहामध्ये मार्कस स्टाॅयनिस, सिकंदर रझा, शाकिब अल हसन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना प्रत्येकी एका स्थानाचा फायदा झाला आहे. मोहम्मद नबी चार स्थानांच्या नुकसानीमुळे अव्वल पाचमधून बाहेर झाला आहे.