- सौरव गांगुली
काही महिन्याआधी निदहास तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात कोलंबो येथे भारत- बांगला देश यांच्यात जोरदार लढत झाली होती. तो सामना बांगला देशने चार गड्यांनी गमावला खरा मात्र पराभवानंतरही बांगला देशने शान मात्र कायम राखली होती. आज शुक्रवारी आशिया चषकाच्या अंतिम लढतीत पुन्हा एकदा उभय संघ आमनेसामने येणार आहेत. यावेळी भारताचे नेतृत्व रोहितकडे असेल.
भारत जेतेपदाचा प्रबळ दावेदार असला तरी बांगला देशने शानदार मुसंडी मारली तर अफगाणिस्तानने झुंजारवृत्तीचा परिचय दिला. पाकिस्तान आणि श्रीलंका संघ सहजरीत्या बाहेर होणे, विश्व क्रिकेटसाठी धक्का आहे. मागील काही वर्षांपासून पाकिस्तान , श्रीलंका आणि वेस्ट इंडिज संघ फारच खराब कामगिरी करीत आहेत. नजीक भविष्यात या संघाची कामगिरी सुधारण्याचीही चिन्हे नाहीत.या देशांनी क्रिकेट लोकप्रिय करण्यात मोलाचे योगदान दिले. क्रिकेट जगताला अनेक नामांकित खेळाडूही दिले. या संघांना पुन्हा एकदा बलाढ्य बनविण्यासाठी दिग्गजांनी एका व्यासपीठावर येणे गरजेचे आहे.
स्पर्धेत भारत अपराजित राहून अंतिम फेरीत दाखल झाला. हाँंगकाँगविरुद्ध डळमळीत सुरुवात झाल्यानंतर भारत प्रत्येक सामन्यागणिक बलाढ्य बनला. रोहित आणि शिखर धवन यांनी झकास सुरुवात केली. बांगला देशला सामन्यावर वर्चस्व मिळविण्यासाठी या दोन्ही फलंदाजांना अक्षरश: बांधून ठेवावे लागणार आहे. सलामीला दोघांच्या दमदार कामगिरीमुळेच भारताच्या मधल्या फळीला फारसे कष्ट घ्यावे लागले नव्हते. अफगाणविरुद्ध या दोघांची उणीव संघाला जाणवली. मधली फळी अपयशी ठरल्यानंतर सामना कसाबसा वाचला.
पाक आणि बांगला देशविरुद्ध खेळलेलाच भारतीय संघ अंतिम सामन्यात उतरेल. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांचा वेगवान मारा खेळून काढण्यासाठी बांगला देशला सावधपणा बाळगावा लागेल. भारताला नमविण्यासाठी बांगला देशला किमान २७५ धावा कराव्या लागतील किंवा भारताला कमी धावसंख्येवर रोखावे लागेल. शाकिबची अनुपस्थिती बांगला देशसाठी मोठा धक्का आहे. अशावेळी मुशफिकूर रहीम याची जबाबदारी वाढेल. अन्य सहकाऱ्यांना देखील खांद्याला खांदा लावून योगदान द्यावे लागेल. (गेमप्लान)
Web Title: India's strongest contender
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.