नवी दिल्ली : सध्या भारतीय संघ टी-२० (T20 Series) मालिकेसाठी वेस्टइंडिजच्या (West Indies) दौऱ्यावर आहे. वेस्टइंडिजविरूद्धच्या मालिकेत भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) शानदार फॉर्ममध्ये आहे. सूर्यकुमारने तिसऱ्या टी-२० सामन्यात आक्रमक खेळी केल्याने त्याला चांगलाच फायदा झाला आहे. आयसीसीने टी-२० मधील फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार यादवने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
दरम्यान, सूर्यकुमार आता लवकरच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) मागे टाकू शकतो. कारण अव्वल स्थानापासून तो केवळ एक पाऊल दूर आहे. बाबर आणि सूर्यकुमार यांच्यामध्ये फक्त २ रेटिंग्स पॉइंटचे अंतर आहे. त्यामुळे पुढच्या टी-२० सामन्यात देखील सूर्यकुमारने ताबडतोब फलंदाजी केली तर त्याच्याकडे बाबरला मागे टाकण्याची सुवर्णसंधी असेल. टी-२० क्रमवारीत सूर्यकुमार एकमेव भारतीय फलंदाज आहे, ज्याचा समावेश पहिल्या १० खेळाडूंमध्ये आहे.
सूर्यकुमारचा बोलबालासूर्यकुमार ८१६ रेटिंग्सह दुसऱ्या स्थानावर स्थित आहे, तर बाबर आझम ८१८ रेटिंग्स पॉइंटसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवस पाकिस्तानचा संघ टी-२० सामने खेळणार नाही त्यामुळे सूर्यकुमार बाबरला मागे टाकून पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावणार का हे पाहण्याजोगे असेल. कारण दोघांमध्ये केवळ २ रेटिंग्स पॉइंटचे अंतर आहे. सूर्यकुमारची भारताच्या टी-२० संघातील जागा निश्चित झाली असून त्याने मागील काही सामन्यांपासून उल्लेखणीय कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे वेस्टइंडिजविरूद्धच्या मालिकेत तो सलामीवर फलंदाजाच्या भूमिकेत खेळत असून आतापर्यंत ३ सामन्यात त्याने १११ धावा केल्या आहेत.
आयसीसी क्रमवारीतील गोलंदाजांबाबत भाष्य करायचे झाले तर, भुवनेश्वर कुमार वगळता कोणताच भारतीय गोलंदाज क्रमवारीत टॉप-१० मध्ये नाही. भुवनेश्वर ६५३ रेटिंग्ससह ८ व्या क्रमांकावर स्थित आहे. सूर्यकुमारने आतापर्यंत एकूण २२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने एकूण ६४८ धावा केल्या आहेत.