व्हीव्हीएस लक्ष्मण -
पहिल्या टी-२० लढतीत इंग्लंडने सर्व आयुधे वापरुन भारताला बॅकफूटवर ढकलले यात आश्चर्य मानण्याचे कारण नाही. या प्रकारातील नंबर वन हा लौकिक कायम राखताना शुक्रवारी रात्री त्यांनी अष्टपैलू कामगिरीचा परिचय दिला. कसोटी मालिकेतील चाचपडलेपणा त्यांनी मागे सोडला. खेळपट्टीवरील उसळीचा पाहुण्या गोलंदाजांनी पूरेपूर लाभ घेतला. जगातील उत्कृष्ट संघाविरुद्ध खेळताना आपला संघदेखील तितकाच तुल्यबळ असणे कधीही चांगले. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांना सलामीला पाठविण्याची कल्पना मात्र रुचली नाही. रोहित शर्माला खेळवायला हवे होते. मी रोहितला लवकर मैदानात पाहू इच्छतो. (India's tactics failed in the team selection)भारताच्या फलंदाजीचा दृष्टिकोन माझ्यासाठी आश्चर्यकारक होता. सर्व ठिकाणी एकसारखे तंत्र लागू होत नाही. पॉवर प्लेमधील गोष्टींबद्दल भारत ज्या मार्गाने चालत आला आहे, त्याच पारंपरिक गोष्टींची चर्चा सुरू झाली आहे, हे त्यांच्यासाठी कार्य करणारे एक सूत्र आहे. तथापि, भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासून धडाका दाखविण्याचे जे तंत्र अवलंबले, तेच कमी धावांवर बाद होण्यास कारणीभूत ठरले. इंग्लंड संघात दर्जेदार गोलंदाजांचा भरणा आहे. जोफ्रा आर्चर, मार्क वूड यांनी सातत्याने १५० किमी प्रतिताशी वेगवान उसळी घेणारे चेंडू टाकले.यामुळे भारताला आता स्वत:च्या रणनीतीचा फेरआढावा घ्यावाच लागेल. पॉवर प्लेदरम्यान संघाने तीन फलंदाज गमाविल्यानंतर खेळावर पकड निर्माण करणे कठीण होते. ऋषभ पंत आणि पांड्या यांनी काही प्रमाणात प्रयत्न करून पाहिला, पण यात यशस्वी ठरला तो श्रेयस अय्यर. श्रेयसच्या खेळात परिपक्वता आणि निडरता जाणवली. त्याचा अनुभव कमी असेल. मात्र, तो या प्रकारात अधिक सामने खेळला शिवाय फ्रॅन्चायजीचे नेतृत्व करण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. त्याने कौशल्य पणाला लावून योगदान दिले, तरीही भारतीय संघ किमान ५० धावांनी माघारला. भारताने आता मुसंडी मारण्याच्या स्वत:च्या क्षमतेचा परिचय द्यायला हवा. इंग्लंड संघ किती माहीर आहे, हे ध्यानात ठेवून विराट आणि सहकाऱ्यांना खेळात सुधारणा करावी लागणार आहे.
माझ्या मते, भारताच्या गोलंदाजीतील तारतम्य चुकीचे होते. हार्दिक पांड्याकडून सुरुवात करून घेतली तरी तिसरा फिरकी गोलंदाज खेळविण्यापेक्षा एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज घेता आला असता. शुक्रवारी खेळपट्टीवर दवबिंदू नव्हते. तरीही नाणेफेकीच्या वेळी दोन्ही कर्णधारांनी दवबिंदूची भीती व्यक्त केली. एकंदरीतरीत्या कसोटी सामन्याच्यावेळी वापरण्यात आलेल्या खेळपट्टया आणि कालची खेळपट्टी यात साधर्म्य दिसले नाही. त्यामुळे अतिरिक्त फिरकी गोलंदाजांची कल्पनाच फसली.