बर्मिंघम : इंग्लंडविरुद्ध आजपासून (बुधवार) प्रारंभ होत असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ विदेशातील निराशाजनक कामगिरीचा कलंक मिटविण्याच्या निर्धाराने उतरणार आहे, तर यजमान संघ मायदेशात कसोटी क्रिकेटमधील गमावलेली लय प्राप्त करण्यास प्रयत्नशील राहील.
इंग्लंडचा हा १००० वा कसोटी सामना आहे, पण जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला भारतीय संघ त्यांच्या आनंदावर विरजण घालू शकतो. भारताने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये इंग्लंडमध्ये अखेरची कसोटी मालिका जिंकली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघासाठी त्या यशाची पुनरावृत्ती करणे सोपे नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला २०११ व २०१४ मध्ये अनुक्रमे ४-० व ३-१ ने पराभव स्वीकारावा लागला होता. भारताने इंग्लंडमध्ये ५७ कसोटी सामने खेळले, पण केवळ ६ सामने जिंंकता आले.
इंग्लंडचा यापूर्वीचा फॉर्म त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. सप्टेंबर २०१७ नंतर इंग्लंडला आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध एकूण ९ कसोटी सामन्यांपैकी केवळ एक सामना जिंकता आला. मायदेशात गेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडला वेस्ट इंडिज व पाकिस्तान संघांनी पराभूत केले. दोन्ही संघांनी फलंदाजीमध्ये रुट, जॉनी बेयरस्टो व अॅलिस्टर कुकवर अवलंबून असलेल्या इंग्लंड संघावर वर्चस्व गाजवले.
दुसऱ्या बाजूचा विचार करता भारतीय संघाने येथे सहापैकी तीन विजय २००२ नंतर मिळवले आहेत. भारताचे सहायक प्रशिक्षक संजय बांगर सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली लीड््सवर विजय मिळवणाºया संघाचे सदस्य होते. यष्टिरक्षक दिनेश कार्तिक २००७ मध्ये संघात होता. कर्णधार विराट कोहली २०११ आणि वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा २०१४ मध्ये इंग्लंड दौºयावर गेलेले आहेत.
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौºयात केलेल्या चुका टाळाव्या लागतील. त्यावेळी संघ व्यवस्थापनाने अजिंक्य रहाणेच्या तुलनेत रोहित शर्माला प्राधान्य दिले होते. यावेळी के. एल. राहुलही संघात स्थान मिळवण्याचा दावेदार आहे, पण कोहली व प्रशिक्षक शास्त्री यांनी तिसरा सलामीवीर म्हणून राहुलला संधीची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राहुलने एसेक्सविरुद्ध ५८ आणि दुसºया डावात नाबाद ३६ धावा केल्या होत्या. शिखर धवनला मात्र दोन्ही डावांत केवळ चार चेंडू खेळता आले. चार वर्षांपूर्वी त्याला उसळी घेणाºया ड्युक चेंडूला खेळताना अडचण भासली होती. त्यावेळी तीन कसोटी सामन्यांत त्याने १२२ धावा केल्या होत्या. चेतेश्वर पुजाराही फॉर्मात नाही. त्याला यॉर्कशायरविरुद्ध कौंटी सामन्यांत केवळ १७२ धावा करता आल्या. बंगलोरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध त्याने केवळ ३५ धावा केल्या होत्या. चेम्सफोर्डमध्ये सराव सामन्यात त्याने १ व २३ धावा केल्या.
गोलंदाजीमध्ये आर. अश्विन व ईशांत यांच्याकडे कौंटी क्रिकेटचा अनुभव आहे. भारतीय गोलंदाजांची तयारी यावेळी चांगली असल्याचे मानले जात आहे. भारतापुढे अश्विन व अन्य फिरकीपटूंच्या निवडीबाबत द्विधा मन:स्थिती राहील. उष्ण वातावरणानंतर आता येथे थंड वारे वाहत आहेत. शनिवार ते मंगळवारपर्यंत येथे पाऊस झाला. बुधवारी सामन्याच्या वेळेपर्यंत मैदान खेळण्यायोग्य राहील, पण खेळपट्टीमध्ये आर्द्रता कायम असेल. मैदानावरील कर्मचाºयांनी बाह्यमैदानावर पाण्याचा बराच वापर केला असून, पावसामुळे आर्द्रता आहे. अशा स्थितीत कोहली एका फिरकीपटूला संधी देण्याची शक्यता असून, अनुभवाच्या आधारावर अश्विनचे पारडे कुलदीप यादव व रवींद्र जडेजा यांच्या तुलनेत वरचढ आहे.
इंग्लंड संघ पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीपच्या माºयाला सामोरे जाण्याची तयारी करीत आहे. जो रुटचा अपवाद वगळता उर्वरित आघाडीच्या फलंदाजांना यादवच्या माºयाला यशस्वीपणे तोंड देता आलेले नाही. गोलंदाजीमध्ये मोईन अलीच्या तुलनेत आदिल रशीदला प्राधान्य मिळते का, याबाबत उत्सुकता आहे. वेगवान गोलंदाज जेमी पोर्टरलाही संधी मिळू शकते. (वृत्तसंस्था)
कोहलीसाठी पहिल्या २० धावा अधिक महत्त्वाच्या
- राजपूत
भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी इंग्लंडविरुद्ध बर्मिंघममध्ये बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत सुरुवातीच्या २० धावा अधिक महत्त्वाच्या आहेत, असे मत भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले. विराट आक्रमक खेळाडू आहे. पुढे सरसावत संघाचे नेतृत्व करणे त्याला आवडते. गेल्या दौºयात त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी न करता आल्यामुळे यावेळी सर्वांची नजर त्याच्या कामगिरीवर राहील.
तो चार वर्षांत परिपक्व झाला आहे. तो यापूर्वीच्या तुलनेत आता आपल्या खेळाला चांगल्या प्रकारे समजतो. आता जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांचे वय आणखी चार वर्षांनी वाढले आहे. त्यांच्याकडे आता तो वेग राहणार नाही, पण चेंडू स्विंग करण्याचे त्यांचे कसब बघता इंग्लंडमधील वातावरणात ते धोकादायक ठरतील. कोहली आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि मायदेशात धावा फटकावण्यात यशस्वी ठरला आहे, पण २०१४ च्या इंग्लंड दौºयात वेगवान गोलंदाज विशेषत: अँडरसनने त्याच्याविरुद्ध वर्चस्व गाजवले होते.
राजपूत म्हणाले, कोहलीच्या मनात स्वत:ला इंग्लंडविरुद्ध सिद्ध करण्याचे घोळत असेल. कोहलीने आपल्या खेळावर बरीच मेहनत घेतली आहे. तो शानदार फॉर्मात आहे. तो मालिकेची सुरुवात मोठ्या खेळीने करण्यास उत्सुक असेल. त्यामुळे पहिला कसोटी सामना अधिक महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी सुरुवातीच्या २० धावा अधिक महत्त्वाच्या आहेत. जर तो २० धावांचा पल्ला गाठण्यात यशस्वी ठरला, तर तो मागे वळून बघणार नाही.
प्रतिस्पर्धी संघ
भारत :- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, करुण नायर, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
इंग्लंड :- जो रूट (कर्णधार), अॅलिस्टर कुक, कीटोन जेनिंग्स, जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, बेन स्टोक्स, डेव्हिड मालान, मोईन अली, आदिल रशीद, जेमी पोर्टर, सॅम कुरेन, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड.
आजचा सामना :
स्थळ : एजबस्टन, वेळ : भारतीय वेळेनुसार दु .३.३० थेट प्रक्षेपण: सोनी सिक्स, सोनी टेन ३
Web Title: India's 'Test' against England today; England ready for 1000th game
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.