जानेवारी २०२२ पासून भारतीय संघाबाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) महत्त्वाच्या निर्णय घेतला आहे. कसोटी संघातून वगळल्यानंतर अजिंक्यने रणजी करंडक स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली. मुंबईला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले असले तरी त्याने ७ सामन्यांत ५७.६३च्या सरासरीने ६३४ धावा केल्या. त्यात दोन शतकांचा समावेश होता. भारतीय संघ ९ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे आणि चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला. पण, त्यात अजिंक्यची नाव नव्हते आणि उर्वरित दोन सामन्यांसाठी त्याची निवड होण्याची शक्यता कमीच आहे. सर्फराज खान, सूर्यकुमार यादव प्रबळ दावेदार आहेत.
भारतीय संघाचा कसोटीपटू अजिंक्य रहाणे आता इंग्लीश कौटी अजिंक्यपद स्पर्धेत लेईसेस्टरशायर ( Leicestershire ) क्लबकडून खेळणार आहे. कौंटी अजिंक्यपद आणि वन डे चषक स्पर्धेत तो या क्लबचे प्रतिनिधित्व करणार आहे. यापूर्वीही अजिंक्य कौंटी अजिंक्यपद स्पर्धेत खेळला होता. २०१८मध्ये त्याने हॅम्पशायर क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. आता तो एका वर्षासाठी लेईसेस्टरशायर क्लबकडून खेळणार आहे. ३४ वर्षीय अजिंक्यच्या समावेशामुळे लेईसेस्टरशायर क्लबची फलंदाजी मजबूत झाली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"