बर्मिंगहॅम : येथे ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेसाठी दाखल झालेल्या १९ सदस्यांच्या भारतीय पथकातील तीन खेळाडू मंगळवारी रात्री झालेल्या कोविड चाचणीत पॉझिटिव्ह आढळले होते. बीडब्ल्यूएफने बुधवारी घेतलेल्या चाचणीत तेच खेळाडू निगेटिव्ह आढळून आल्याने ते स्पर्धेत खेळू शकतील.
तीन खेळाडू आणि एक सहयोगी स्टाफच्या चाचणीचा नमुना मंगळवारी पॉझिटिव्ह आला. अन्य खेळाडूंना चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. त्यामुळे सरावदेखील होऊ शकला नाही.
मूळचे डेन्मार्कचे भारतीय कोच माथियास बो यांनी बुधवारी एक पोस्ट लिहिली असून त्यात,‘ संघातील कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नसल्याने स्पर्धेत सहभागी होण्यास सज्ज आहोत,’ असे म्हटले आहे. बीडब्ल्यूएफ आणि बॅडमिंटन इंग्लंडनेदेखील या वृत्तास दुजोरा दिला. मंगळवारी घेतलेल्या चाचणीच्या अहवालावर शंका उपस्थित झाल्यानंतर दुसऱ्यांदा चाचणीचा निर्णय घेण्यात आला. यामुळे स्पर्धादेखील विलंबाने सुरू करण्याचा आयोजकांनी निर्णय घेतला. सायना नेहवाल व पारुपल्ली कश्यप यांचेनमुने २४ तास आधी घेण्यात आले. त्यांचा अहवाल मात्र उशिरा मिळाला.