भारताचे थरारक जेतेपद!, चार गडी राखून बांगलादेशच्या हातून सामना हिसकावला

अखेरच्या २ षटकात विजयासाठी ३४ धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने केवळ ८ चेंडूत नाबाद २९ धावांचा तडाखा देत भारताला बांगलादेशविरुद्ध ४ गडी राखून थरारक विजय मिळवून दिला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:42 AM2018-03-19T01:42:19+5:302018-03-19T01:42:19+5:30

whatsapp join usJoin us
India's thrilling title, with four wickets to save the match from the hands of Bangladesh | भारताचे थरारक जेतेपद!, चार गडी राखून बांगलादेशच्या हातून सामना हिसकावला

भारताचे थरारक जेतेपद!, चार गडी राखून बांगलादेशच्या हातून सामना हिसकावला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो : अखेरच्या २ षटकात विजयासाठी ३४ धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने केवळ ८ चेंडूत नाबाद २९ धावांचा तडाखा देत भारताला बांगलादेशविरुद्ध ४ गडी राखून थरारक विजय मिळवून दिला. यासह प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये टी२० तिरंगी मालिकेत सहभागी झालेल्या युवा भारतीय संघाने दिमाखदार जेतेपद उंचावले.
प्रेमदासा स्टेडियमवर १६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने २० षटकात ६ बाद १६८ धावा केल्या. अत्यंत थरारक झालेल्या या सामन्यात अखेरच्या ३ षटकात भारताला ३५ धावांची गरज असताना युवा अष्टपैलू विजय शंकर दडपणाखाली ढेपाळला. यावेळी मुस्तफीझूर रहमानने टिच्चून मारा करत पहिले ४ चेंडू निर्धाव टाकले, तर पाचव्या चेंडूवर विजयने लेगबायच्या जोरावर धाव घेतली. मात्र, अखेरच्या चेंडूवर स्थिरावलेला मनिष पांडे (२८) बाद झाल्याने बांगलादेश मजबूत स्थितीत आला. शंकरच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचा पराभव नजीक दिसत होता.
मात्र, अनुभवी दिनेश कार्तिकने १९व्या षटकात सर्व चित्रंच पालटले. त्याने रुबेल हुसैनच्या षटकात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत एकूण २२ धावांची लयलूट केली आणि हाच ‘टर्निंग पॉइंट’ ठरला. अखेरच्या षटकात १२ धावांची गरज असताना शंकर पुन्हा एकदा चाचपडला, मात्र त्याने चौथ्या चेंडूवर एक चौकार मारला. पाचव्या चेंडूवर शंकर झेलबाद झाला, परंतु त्यादरम्यान स्ट्राइकवर कार्तिक आला व अखेरच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना त्याने षटकार ठोकत भारताचा थरारक विजय साकारला. (वृत्तसंस्था)
>सामनावीर ठरलेल्या दिनेश कार्तिकने केवळ ८ चेंडू खेळताना संपूर्ण सामना फिरवला. त्याने २ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करत बांगलादेशच्या हातातून सामना अक्षरश: खेचला. कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून भारताला थरारक विजय मिळवून दिल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंना आपली निराशा लपवता आली नाही.
प्रमुख फलंदाज ढेपाळल्यानंतर शब्बीर रहमान (७७) याने झळकावलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने ८ बाद १६६ धावांची समाधानकारक मजल मारली. फिरकीपटू युझवेंद्र चहलने ३ बळी घेत चांगला मारा केला. शब्बीरने ५० चेंडूत ७ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी करत ७७ धावांची दमदार खेळी केली. बांगलादेशने आक्रमक सुरुवात करत आपला इरादा स्पष्ट केला.चहल व वॉशिंग्टन सुंदर यांनी बांगलादेशची ११व्या षटकात ४ बाद ६८ अशी अवस्था केली. परंतु, यावेळी शब्बीरने सर्व सूत्रे आपल्याकडे घेत दमदार फटकेबाजीस सुरुवात केली. त्याने महमुदुल्लाहसह (२१) संघाला सावरले. महमुदुल्लाह धावबाद झाल्यानंतर भारताने बांगलादेशला रोखले. जयदेव उनाडकटने शब्बीरला त्रिफळाचीत केले. मेहदी हसन याने ७ चेंडूत २ चौकार व एका षटकारासह नाबाद १९ धावा केल्याने बांगलादेशला दिडशेचा पल्ला पार करण्यात यश आले. चहलने ३ तर उनाडकटने २ बळी मिळवत चांगला मारा केला.
>धावफलक
बांगलादेश : तमिम इक्बाल झे. शार्दुल गो. चहल १५, लिटॉन दास झे. रैना गो. सुंदर ११, शब्बीर रहमान त्रि. गो. उनाडकट ७७, सौम्य सरकार झे. धवन गो. चहल १, मुशफिकूर रहिम झे. शंकर गो. चहल ९, महमुदुल्लाह धावबाद (कार्तिक - शंकर) २१, शाकिब अल हसन धावबाद (राहुल - शंकर) ७, मेहदी हसन नाबाद १९, रुबेल हुस्सेन त्रि. गो. उनाडकट ०, मुस्तफीझूर रहमान नाबाद ०. अवांतर - ६. एकूण : २० षटकात ८ बाद १६६ धावा. गोलंदाजी : जयदेव उनाडकट ४-०-३३-२; वॉशिंग्टन सुंदर ४-०-२०-१; युझवेंद्र चहल ४-०-१८-३; शार्दुल ठाकूर ४-०-४५-०; विजय शंकर ४-०-४८-०.
भारत : शिखर धवन झे. अरिफुल हक गो. शाकिब १०, रोहित शर्मा झे. महमुदुल्लाह गो. नझमुल ५६, सुरेश रैना झे. रहिम गो. रुबेल ०, लोकेश राहुल झे. शब्बीर गो. रुबेल २४, मनिष पांडे झे. शब्बीर गो. रहमान २८, विजय शंकर झे. मेहदी गो. सरकार १७, दिनेश कार्तिक नाबाद २९, वॉशिंग्टन सुंदर नाबाद ०. अवांतर - ४. एकूण : २० षटकात ६ बाद १६८ धावा. गोलंदाजी : शाकिब अल हसन ४-०-२८-१; मेहदी हसन १-०-१७-०; रुबेल हुसैन ४-०-३५-२; नझमुल इस्लाम ४-०-३२-१; मुस्तफिझूर रहमान ४-१-२१-१; सौम्य सरकार ३-०-३३-१.

Web Title: India's thrilling title, with four wickets to save the match from the hands of Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.