नवी दिल्ली : इशान किशनच्या धमाकेदार खेळीनंतर भारताच्या 'अ' संघाने दक्षिण आफ्रिकेच्या 'अ' संघावर थरारक विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १६२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची स्थिती फारशी चांगली नव्हती. पण किशनच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने दोन विकेट्स आणि सहा चेंडू राखत हा विजय मिळवला.
भारताने नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या जॉर्ज लिंडेच्या ५२ आणि टेंम्बा बावुमाच्या ४० धावांच्या खेळींच्या जोरावर संघाने १६२ धावा केल्या. भारताच्या दीपक चहर, खलील अहमद, युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
दक्षिण आफ्रिकेच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची ३ बाद ५७ अशी स्थिती झाली होती. त्यानंतर इशान फलंदाजीला आला आणि त्याने सारे समीकरण बदलून टाकले. इशानने २४ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५५ धावा केल्या. यावेळी कृणाल पंड्याने नाबाद २३ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.