मुंबई - सुपरओव्हरपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. याबरोबरच भारतीय महिला संघाने ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची गरज होती. तेव्हा देविका वैद्य हिने चौकार ठोकत सामना टाय केला. तर सुपर ओव्हरमध्ये स्मृती मंधानाने फटकेबाजी करत २० धावांपर्यंत मजल मारून दिल्यानंतर रेणुका सिंह हिने ऑस्ट्रेलियाला १६ धावांवर रोखत भारताला ४ धावांनी विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. त्यानंतर कर्णधार एलिसा हिली हिने ऑस्ट्रेलियन संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. पण दीप्ती शर्माने हिलीला २५ धावांवर बाद करून पाहुण्या संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर मात्र भारताला गोलंदाजीत आणखी यश मिळाले नाही. बेथ मुनी (५४ चेंडूत नाबाद ८२ धावा) आणि ताहिला मॅकग्रा (५१ चेंडूत नाबाद ७० धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी अभेद्य १५८ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला २० षटकांत १८७ धावांपर्यंत मजल मारून दिली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ८.४ षटकात ७६ धावांचा झंझावाती सलामी दिली. मात्र शेफाली वर्मा (३४) आणि जेमिमा रॉड्रिक्स (४) या पाठोपाठ बाद झाल्याने भारताचा डाव अडचणीत आला. त्यानंतर स्मृतीने आपलं अर्धशतक पूर्ण करताना हरमनप्रीत कौरसोबत ६१ धावांची भागीदारी करत भारतीय संघाचे आव्हान कायम ठेवले.
हरमनप्रीत (२१) आणि स्मृती मंधाना (४९ चेंडूत ७९ धावा) या पाठोपाठच्या षटकात बाद झाल्याने भारताचा डाव अडखळला. मात्र रिचा घोष ( नाबाद २६) आणि देविका वैद्य (नाबाद ११) यांनी भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. अखेरीस शेवटच्या चेंडूत ५ धावांची गरज असताना देविकाने चौकार ठोकत भारताला सामन्यात बरोबरी साधून दिली.
त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये स्मृती मंधानाने ३ चेंडूत १३ धावा काढून भारताला एका षटकात २० धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानंतर रेणुका सिंह हिने किफायतशीर मारा करत ऑस्ट्रेलियन संघाला १६ धावांवर रोखले आणि भारताला ४ धावांनी विजय मिळवून दिला.