- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)
भारत - बांगलादेश यांच्यातील टी२० मालिकेचा अंतिम सामना अत्यंत थरारक झाला. असे रोमांचक सामने मी खूपच कमी पाहिलेत, ज्यांचा निकाल अखेरच्या चेंडूवर लागला आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत अनेक सामने रंगले आहेत, पण अखेरच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकून देण्याची किमया खूप कमी पाहण्यात आली आहे. मी जावेद मियादादला १९८६मध्ये अशी कामगिरी करताना पाहिले आहे. त्या वेळी ज्या प्रकारे पाकिस्तानने भारताला नमविले होते, काहीशी त्याच प्रकारे या सामन्यात दिनेश कार्तिकने कामगिरी केली. त्याने अद्वितीय खेळ केला. विशेष म्हणजे अखेरच्या चेंडूपर्यंत भारताचा विजय निश्चित दिसत नव्हता. जर टीम इंडिया जिंकली नसती, तर नक्कीच भारतीय चाहते निराश झाले असते. पण ज्या प्रकारे भारताने बाजी मारली, ते पाहता एक गोष्ट सिद्ध झाली की या संघामध्ये खूप मोठी क्षमता आहे; आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न पत्करण्याची वृत्तीही आहे. त्याचबरोबर संघामध्ये गुणवत्तेचीही कमतरता नाहीए. या स्पर्धेमध्ये विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांचा संघात समावेश नसतानाही भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. दखल घेण्याची बाब म्हणजे अष्टपैलू कामगिरी झाली. कोणतेही एक विशेष अपयश अधोरेखित करता येणार नाही. कोणी खूपच चांगला खेळला, कोणी कमी प्रमाणात चांगला खेळला, पण एकूणच ‘जबरदस्त सांघिक खेळ’ झाला. त्याचबरोबर बांगलादेशलाही त्यांच्या कामगिरीचे श्रेय द्यावे लागेल, कारण त्यांनी अखेरपर्यंत झुंज दिली. पण शेवटी जो जिता वही सिकंदर...दिनेश कार्तिकला नक्कीच फारशी संधी मिळत नाही, पण त्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीनंतर कार्तिकला यष्टीरक्षक म्हणून दुसरी पसंती असते. असे असले तरी एक ‘फलंदाज’ म्हणूनही तो संघात स्थान मिळवू शकतो हे त्याने आता सिद्ध केले आहे. सुरेश रैनाला आणखी धावा करता आल्या असत्या. काही सामन्यांत त्याने विकेट अक्षरश: फेकली. लोकेश राहुलच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. रोहित शर्माने या स्पर्धेत चांगली फलंदाजी केली. त्याच्यासह शिखर धवननेही चांगले सातत्य राखले. वॉशिंग्टन सुंदर आणि युझवेंद्र चहल यांनीही छाप पाडली. द. आफ्रिका दौºयात मर्यादित षटकांच्या मालिकेत अपेक्षित कामगिरी न झाल्याने चहलवर काहीशी टीकाही झाली. पण येथे त्याने चांगल्या प्रकारे फिरकी खेळणाºयांना चकविले. तरी माझ्यासाठी सर्वाधिक लक्षवेधी ठरला तो सुंदर. १८ वर्षांच्या या फिरकीपटूने ८ बळी घेतले. ज्या प्रकारे त्याने नियंत्रित व वैविध्यपूर्ण मारा केला ते खूप कौतुकास्पद आहे. इतक्या कमी वयात जबरदस्त आत्मविश्वास असणे खूप चांगली गोष्ट आहे. त्याशिवाय शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकट यांनीही स्वत:ला मर्यादित षटकांच्या संघासाठी सिद्ध केले आहे.टीम इंडियाचे रिपोर्ट कार्डरोहित शर्मा (१० पैकी ८ गुण)रोहितने फलंदाजीमध्ये लक्षवेधी योगदान दिले. पण त्याहून जास्त कर्णधार म्हणून त्याने आपली छाप पाडली. अंतिम सामन्यात दिनेश कार्तिकला फलंदाजीसाठी अखेरपर्यंत राखून ठेवण्याची चाल निर्णायक ठरली.
शिखर धवन (१० पैकी ७)ज्या प्रकारे मालिकेत सुरुवात केली होती, त्याप्रमाणे धवनला सांगता करण्यात काहीसे अपयश आले. पण एकूणच मालिकेत धवन शानदार खेळला. एकदा का त्याचा जम बसला की मात्र त्याला रोखणे कठीण असते. याच प्रकारचे प्रदर्शन त्याला उपखंडाबाहेर दाखवण्याची गरज आहे.
सुरेश रैना (१० पैकी ४.५)रैनाने दोन शानदार खेळी केल्या, त्याचबरोबर काही खराब इनिंगही खेळल्या. त्याने याआधी दिलेले योगदान पाहता, त्याला संधी देणे गरजेचे वाटते. पण असे असले तरी याचा संघाच्या कामगिरीवर परिणाम पडतो हे विसरता कामा नये.
लोकेश राहुल (१० पैकी ४)मालिकेत राहुलला तीन सामने खेळण्यास मिळाले पण संघातील स्थान भक्कम करण्यासारखी अपेक्षित छाप पाडण्यात त्याला अपयश आले. दोन सामन्यांत जम बसल्यानंतरही त्याने आपली विकेट फेकली. यामुळे त्याला फटका बसू शकतो.वॉशिंग्टन सुंदर(१० पैकी ९)या मालिकेत सुंदर माझ्यासाठी सर्वात लक्षवेधी ठरला. १८ वर्षीय सुंदरने आपल्या वयोमानाहून अधिक परिपक्वता, क्षमता आणि वैविध्यता दाखवली. पॉवरप्लेमध्ये अप्रतिम मारा केल्यानंतरही त्याने संघाच्या गरजेनुसार अचूक मारा केला. भविष्यातील बलाढ्य खेळाडूंपैकी एक सुंदर आहे.मनिष पांडे (१० पैकी ७)संपूर्ण मालिकेत खेळताना मनिषने स्वत:ला पुन्हा सिद्ध केले. एक फिनिशर म्हणून त्याने दाखवलेला आत्मविश्वास चांगला होता. तसेच नेहमीप्रमाणे क्षेत्ररक्षणामध्ये त्याने लक्ष वेधले.रिषभ पंत (१० पैकी २.५)मिळालेल्या अनेक संधी साधण्यात आलेल्या अपयशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडण्यात पुन्हा एकदा रिषभ अपयशी ठरला. दोन सामन्यातील खराब कामगिरीमुळे त्याचे संघातील स्थान धोक्यात आले आहे. कमी वय असल्याने त्याला अजूनही संधी मिळू शकते, पण त्याने मिळालेल्या संधीचा फायदा उचलला पाहिजे.शार्दुल ठाकूर (१० पैकी ७)शार्दुलने भेदक आणि बिनधास्त मारा केला. शिवाय त्याच्या कामगिरीत बरीच सुधारणाही दिसली. त्याने टाकलेला ‘नकल’ चेंडू स्पर्धेत चर्चेचा विषय ठरला. तरी त्याने अधिक प्रमाणात प्रयोग करण्याचे टाळले पाहिजे. क्षेत्ररक्षणामध्येही त्याने लक्ष वेधले.मोहम्मद सिराज (१० पैकी २)मालिकेतील केवळ एकंच सामना खेळलेल्या सिराजने धावांची खैरात करताना केवळ एक बळी मिळवला. तरी, आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळणे त्याच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. अपेक्षा आहे की ही संधी साधण्यात तो यशस्वी ठरेल.दिनेश कार्तिक(१० पैकी ८.५)अंतिम सामन्यातील कार्तिकच्या झंझावातीने खेळीच्या जोरावर भारताने केवळ चषक पटकावला नाही, तर त्याच्या संघातील स्थानावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना चोख उत्तरही दिले आहे. यष्ट्यांच्या मागे आणि पुढे दोन्ही ठिकाणी खेळताना तो शानदार ठरला.विजय शंकर(१० पैकी ५.५)एक अतिरिक्त फलंदाज म्हणून पसंती मिळाल्यानंतरही शंकरने गोलंदाजीमध्ये आपली चमक दाखवली. त्याची अष्टपैलू खेळी मालिकेत लक्षवेधी ठरली नसली, तरी त्याचे संघातील स्थान महत्त्वाचे ठरले.जयदेव उनाडकट(१० पैकी ७)डावखुरा गोलंदाज म्हणून जयदेवने भारतीय आक्रमणाला आकार दिला, जो महत्त्वाचा आहे. डेथ ओव्हर्समध्ये अत्यंत विविधतेने मारा करण्याच्या क्षमतेच्या जोरावर तो या मालिकेत यशस्वी ठरला.