sanjana ganesan and jasprit bumrah interview : रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने तमाम भारतीयांना खुशखबर देताना तब्बल १३ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी उंचावली. भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील १७ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३० चेंडूंत ३० धावा हव्या असताना हार्दिक पांड्याने आफ्रिकेचा सेट फलंदाज हेनरिच क्लासेनची विकेट घेतली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने मॅजिकल गोलंदाजी केली. मग अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा अप्रतिम झेल घेऊन भारताची विजयाकडे कूच केली. सामन्यातील अखेरचा चेंडू अर्शदीप सिंगने टाकताच कर्णधार रोहितसह भारतीय शिलेदारांनी एकच जल्लोष केला. टीम इंडियाने विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला.
भारताच्या विजयानंतर प्रेजेंटेटर आणि जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेसनने आपल्या पतीची भारी मुलाखत घेतली. भारताने १३ वर्षानंतर आयसीसीचा किताब जिंकला... पत्नी संजनाच्या या प्रश्नावर बोलताना मालिकावीर जसप्रीत बुमराह म्हणाला की, जे काही झाले त्याबद्दल स्पष्ट सांगता येणार नाही. पण, सामना सुरू असताना आमचीही धाकधुक वाढली होती. मात्र आता विजयाचा आनंद शब्दांत सांगण्यासारखा नाही. ही एक चांगली स्पर्धा होती. अंगद (बुमराहचा मुलगा) देखील इथे आहे आणि तो वडील विश्वचषक जिंकल्याचा आनंद घेत आहे. अखेरच्या काही षटकांमध्ये मी, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी केली. आम्हाला विजयाचा आत्मविश्वास होता. मोठ्या व्यासपीठावर ही कमाल करता आली ही मोठी बाब आहे.
२०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला. २०११ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न मिळालेल्या संधीचं दुःख अखेर त्याच्या मनातून दूर झाले असावे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला संघाने जेतेपदाच्या ट्रॉफीसह निरोप दिला. हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराह यांनी आफ्रिकेच्या हातातून सामना खेचून आणला. सूर्यकुमार यादने २०व्या षटकात घेतलेला कॅच आफ्रिकेच्या पराभवासाठी पुरेसा ठरला.
भारताच्या ७ बाद १७६ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला ८ बाद १६९ धावाच करता आल्या आणि भारताने ७ धावांनी सामना जिंकला. ६ चेंडूंत १६ धावा आफ्रिकेला करायच्या होत्या. हार्दिकने टाकलेला पहिलाच चेंडू डेव्हिड मिलरने सीमापार पाठवला होता, परंतु सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतला. मिलर ( २१) रडत रडत मैदानाबाहेर गेला. हार्दिकने २०व्या षटकात आणखी एक विकेट घेऊन भारताचा विजय पक्का केला.
कोण आहे संजना गणेसन?
६ मे १९९१ रोजी जन्मलेली संजना गणेसन ही प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे. ती मॉडलिंग देखील करायची. ती अनेकदा भारतातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये समालोचन करताना दिसते. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेसनची पहिली भेट २०१३ च्या आयपीएल दरम्यान झाली होती. त्यावेळी संजनाने जसप्रीत बुमराहची मुलाखत घेतली होती. असे बोलले जाते की या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली, परंतु त्यानंतर बराच वेळ त्यांच्यात बोलणे झाले नाही. संजना आणि जसप्रीतची लव्ह स्टोरी खूपच फिल्मी आहे. या दोघांनी बरेच दिवस आपले नाते मीडियापासून दूर ठेवले होते. २०२१ मध्ये जेव्हा जसप्रीत बुमराहला वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली तेव्हा त्यांच्या अफेअरची बातमी पहिल्यांदाच समोर आली होती. लग्नानंतर दोघांनी एकत्र फोटो शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली. लग्नाआधी जसप्रीत आणि संजना दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. या दोघांनी १५ मार्च २०२१ रोजी गोव्यात लग्न केले.
Web Title: India's victory in T20 World Cup 2024 sanjana ganesan and team india's star jasprit bumrah interview, see here video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.