- अयाझ मेमन
आॅस्ट्रेलिया कसोटीला सुरुवात झाली असून भारताची मदार गोलंदाज आणि कर्णधार विराट कोहलीवर अधिक असेल. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यांत भारतीय गोलंदाजांनी चांगले योगदान दिले. गोलंदाजांचे योगदान असले तरी फलंदाजी मात्र ढेपाळली होती. त्यामुळे टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली. या दौºयात गोलंदाज व विराट कोहली यांच्याकडून पुन्हा अपेक्षा असतील. विराट सोडला तर इतर फलंदाज योगदान देण्यात अपयशी ठरत आहेत. मुरली विजय, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल हे विदेशी भूमीवर आतापर्यंत काहीच करू शकले नाहीत. त्यांची हीच स्थिती आॅस्ट्रेलियातही कायम राहिली तर चिंतेचा विषय ठरेल.
राहुलचा अंतिम संघात समावेश आहे. त्याच्याकडे सलामीवीराच्या रूपात पाहिले जात आहे. परंतु रोहित शर्मा याची जागा बदलू शकतो. त्याला जर खेळवले तर हनुमा विहारीचा प्रश्न येईल. हनुमाने नुकतेच अर्धशतक झळकाविले होते. त्यामुळे त्याला बाहेर बसवण्यात काही ‘पॉइंट’ नाही. हनुमा हा एक गोलंदाज पर्यायसुद्धा असू शकतो. गोलंदाजीचा विचार केला तर, आश्विनचा आॅस्ट्रेलियातील रेकॉर्ड चांगला नाही. तो भारतीय खेळपट्टीवर यशस्वी ठरला आहे. परंतु, विदेशी खेळपट्टीवर तो लक्ष वेधू शकला नाही.
आॅस्ट्रेलिया संघात दोन उपकर्णधार आहेत. मिशेल मार्श व ट्राविस हेड हे दोघेही चांगले खेळाडू आहेत. मार्श फॉर्ममध्ये परतला तर तो आॅस्ट्रेलियन संघासाठी फायदेशीर ठरू शकतो. उस्मान ख्वाजाकडून अपेक्षा असतील. त्याच्या भावाला झालेल्या अटकेमुळे त्याच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. परंतु, ख्वाजा दहा-बारा वर्षांपासून खेळत आहे. डेविड व स्मिथ संघात नसल्यामुळे त्याच्याकडून व्यवस्थापनाच्या अपेक्षा असतील. त्याने आॅस्ट्रेलियात चांगल्या धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांसाठी तो मुख्य लक्ष्य असेल.
धवनला शुभेच्छा..
शिखर धवन ३३ वर्षांचा झाला आहे. एक तंदुरुस्त खेळाडू म्हणून विराटनंतर त्याचे नाव आघाडीवर आहे. सध्या संघात खेळाडूंचा फिटनेस हा महत्त्वाचा विषय बनला आहे. जो खेळाडू ‘यो यो’ टेस्ट पास होत नाही त्याला संघात स्थान मिळत नाही. यावरून व्यवस्थापनाचे फिटनेसवर असलेले लक्ष कळून येईल. धवनने २५-२६ व्या वर्षी पदार्पण केले होते. असे असतानाही तो अधिक फिट दिसतो. तो असाच फिट राहिला तर आणखी काही वर्षे निश्चितपणे खेळणार, यात शंका नाही. धवनला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
गंभीरचा निर्णय योग्य...
गंभीरचा निवृत्तीचा हा निर्णय योग्य वाटतो. कारण तो पुनरागमनासाठी २-३ वर्षांपासून प्रयत्न करीत होता. खूप प्रतीक्षेनंतर जेव्हा तुम्हाला संधी मिळत नाही तेव्हा असा निर्णय घ्यावा लागतो. गंभीर भारतीय क्रिकेटचा मोठा चेहरा आहे. त्याने सलामीवीर म्हणून भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान मोठे आहे. विश्वचषकातही त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये केकेआरला दोनवेळा चषक जिंकून दिला आहे. सध्या आठ-दहा खेळाडू १८-२२ वर्षांचे असून ते संधीच्या शोधात आहेत. अशा वेळी स्पर्धा किती आहे, याची कल्पना गंभीरला आहे अणि म्हणूनच त्याने हा निर्णय घेतला.
(संपादकीय सल्लागार)
Web Title: India's Virat and bowlers!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.