फिरकीच्या जाळ्यात भारताचीच ‘विकेट’; ऑस्ट्रेलियाने घेतली पहिल्याच दिवशी सामन्यावर पकड

तिसरा कसोटी सामना ; ऑस्ट्रेलियाने घेतली यजमानांची फिरकी,पहिल्याच दिवशी सामन्यावर पकड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 05:40 AM2023-03-02T05:40:22+5:302023-03-02T05:40:35+5:30

whatsapp join usJoin us
India's 'wicket' in the spinners net; Australia took control of the match on the first day | फिरकीच्या जाळ्यात भारताचीच ‘विकेट’; ऑस्ट्रेलियाने घेतली पहिल्याच दिवशी सामन्यावर पकड

फिरकीच्या जाळ्यात भारताचीच ‘विकेट’; ऑस्ट्रेलियाने घेतली पहिल्याच दिवशी सामन्यावर पकड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 इंदूर : फिरकीविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा उडत असलेला गोंधळ पाहून भारताने तिसऱ्या कसोटीतही पहिल्या दिवसापासून फिरकी घेणारी खेळपट्टी तयार केली. मात्र,यामध्ये भारतीयांचाच बळी गेल्याचे चित्र तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी दिसून आले. प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव १०९ धावांत संपुष्टात आल्यानंतर कांगारूंनी पहिल्या दिवसअखेर ५४ षटकांत ४ बाद १५६ धावांची मजल मारत ४७ धावांची आघाडी घेतली.

चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर चषक मालिकेत २-० अशी आघाडी घेतलेल्या भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय सपशेल चुकल्याचे दिसून आले. मॅथ्यू कुहनेमन याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम मारा करताना १६ धावांत ५ बळी घेत भारतीयांची दाणादाण उडवली. कांगारूंचा अनुभवी ऑफ स्पिनर नॅथन लियॉन यानेही ३ बळी घेतले. केवळ ३३.२ षटकांमध्ये पहिला डाव संपुष्टात आल्यानंतर भारतीयांनी खेळपट्टी फिरकीला साथ देत असल्याचे पाहून दोन्ही टोकाकडून फिरकी माऱ्याने सुरुवात केली. इथेच भारतीयांकडून मोठी चूक झाली.

सुरुवातीला रविचंद्रन अश्विन-रवींद्र जडेजा यांच्याविरुद्ध कांगारू काहीसे चाचपडले. मात्र, हळूहळू त्यांना दोघांचाही फिरकी मारा कळून चुकला. यामुळे ऑस्ट्रेलियाला जम बसवता आला. त्यातही, जडेजाच्या गोलंदाजीवर दोन डीआरएस निर्णय चुकल्यानंतर अश्विनच्या गोलंदाजीवर भारतीयांनी मार्नस लाबुशेनविरुद्ध पायचीतसाठी डीआरएस घेतला नाही. यावेळी रिप्लेमध्ये तो बाद असल्याचे स्पष्टही झाले. त्यावेळी लाबुशेन अवघ्या ७ धावांवर खेळत होता. याचा फायदा घेत लाबुशेनने ९१ चेंडूंत ३१ धावा केल्या. त्याआधी, लाबुशेनने धावांचे खातेही उघडले नसताना जडेजाने चौथ्याच षटकात त्याला त्रिफळाचीत केले होते. मात्र, हा नो बॉल ठरला होता. 

जडेजाने ६३ धावांत ४ बळी घेत भारताला काहीसे पुनरागमन करून दिले. उस्मान ख्वाजाने १४७ चेंडूंत ४ चौकारांसह ६० धावांची संथ खेळी करत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. ख्वाजा-लाबुशेन यांनी दुसऱ्या गड्यासाठी केलेली ९६ धावांची भागीदारी कांगारूंना भक्कम स्थितीत घेऊन गेली. कर्णधार स्टीव्ह स्मिथ ३८ चेंडूंत २६ धावा करून परतला. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पीटर हँड्सकोम्ब (७*) आणि कॅमरून ग्रीन (६) खेळपट्टीवर होते.
त्याआधी, भारतीयांचा प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकला. कर्णधार रोहित शर्मा सहाव्याच षटकात कुहनेमनला पुढे येऊन षटकार मारण्याच्या नादात यष्टिचीत झाला आणि भारताच्या फलंदाजीला गळती लागली. लोकेश राहुलच्या जागी सलामीला खेळलेल्या शुभमन गिलला (१८ चेंडूंत २१ धावा) चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. विराट कोहलीही (५२ चेंडूंत २२ धावा) स्थिरावल्यानंतर बाद झाला. चेतेश्वर पुजारा (१), रवींद्र जडेजा (४) आणि श्रेयस अय्यर (०) खराब फटका मारुन परतले. अर्धा संघ केवळ ४५ धावांत गमावल्यानंतर भारतीयांवरील दडपण स्पष्ट दिसून आले. श्रीकर भरत (३० चेंडूंत १७) आणि उमेश यादव (१३ चेंडूंत १७) यांच्या छोटेखानी आक्रमकतेमुळे भारताला शंभर धावांचा पल्ला पार करता आला.

    चेतेश्वर पुजारा लियॉनविरुद्ध १२व्यांदा बाद झाला. इंग्लंडच्या जेम्स अँडरसननेही पुजाराला १२वेळा बाद केले आहे.
    भारताने कसोटी सामन्यात दोन्ही बाजूने फिरकी गोलंदाजांसह सुरुवात करण्याची केवळ तिसरी वेळ. याआधी, १९६३-६४ मध्ये इंग्लंडविरुद्ध (एम. एल. जयसिंहा-सलिम दुरानी) आणि २०१२-१३ मध्येही इंग्लंडविरुद्धच (अश्विन-प्रज्ञान ओझा) भारताने अशी सुरुवात केली होती.
    विराट कोहलीने भारतात २०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. अशी कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकर (२५८) आणि महेंद्रसिंग धोनी (२०५) यांच्यानंतरचा केवळ तिसरा भारतीय ठरला.

धावफलक
भारत : रोहित शर्मा यष्टीचीत कॅरी गो. कुहनेमन १२, शुभमन गिल झे. स्मिथ गो. कुहनेमन २१, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. लियॉन १, विराट कोहली पायचीत गो. मर्फी २२, रवींद्र जडेजा झे. कुहनेमन गो. लियॉन ४, श्रेयस अय्यर त्रि. गो. कुहनेमन ०, श्रीकर भरत पायचीत गो. लियॉन १७, अक्षर पटेल नाबाद १२, रविचंद्रन अश्विन झे. कॅरी गो. कुहनेमन ३, उमेश यादव पायचीत गो. कुहनेमन १७, मोहम्मद सिराज धावबाद (हेड-लियॉन) ०. अवांतर - ०. एकूण : ३३.२ षटकांत सर्वबाद १०९ धावा.

बाद क्रम : १-२७, २-३४, ३-३६, ४-४४, ५-४५, ६-७०, ७-८२, ८-८८, ९-१०८, १०-१०९.
गोलंदाजी : मिचेल स्टार्क ५-०-२१-०; कॅमरुन ग्रीन २-०-१४-०; मॅथ्यू कुहनेमन ९-२-१६-५; नॅथन लियॉन ११.२-२-३५-३; टॉड मर्फी ६-१-२३-१.

ऑस्ट्रेलिया : ट्रॅविस हेड पायचीत गो. जडेजा ९, उस्मान ख्वाजा झे. गिल. गो. जडेजा ६०, मार्नस लाबुशेन त्रि. गो. जडेजा ३१, स्टीव्ह स्मिथ झे. भरत गो. जडेजा २६, पीटर हँड्सकोम्ब खेळत आहे ७, कॅमरुन ग्रीन खेळत आहे ६, अवांतर - १७. एकूण : ५४ षटकांत ४ बाद १५६ धावा.
बाद क्रम : १-१२, २-१०८, ३-१२५, ४-१४६.
गोलंदाजी : रविचंद्रन अश्विन १६-२-४०-०; रवींद्र जडेजा २४-६-६३-४; अक्षर पटेल ९-०-२९-०; उमेश यादव २-०-४-०; मोहम्मद सिराज ३-०-७-०.

झुंजार उमेशने जिंकले मन
उमेश यादवने मोठे फटके मारत भारताला शंभरी गाठून दिली. मात्र, त्याहीपेक्षा त्याच्या जिद्दीला सर्वांनी सलाम केला. उमेशच्या वडिलांचे २२ फेब्रुवारीला निधन झाले. त्यानंतर अवघ्या सात दिवसांत स्वत:ला सावरले. त्याने प्रथम लियॉनला षट्कार ठोकला. नंतर टॉड मर्फीला गुडघ्यावर बसून खणखणीत षट्कार खेचला. 

लॉर्डस्, ईडनच्या पंक्तीत होळकर मैदान
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीच्या निमित्ताने होळकर मैदानावर बुधवारी घंटा वाजवून सामना सुरू करण्याची परंपरा सुरू झाली. यामुळे हे मैदान लॉर्डस् आणि ईडन गार्डन यांच्या पंक्तीत आले. एमपीसीएचे अध्यक्ष अभिलाष खांडेकर आणि इंदूरच्या होळकर राजघराण्याचे वंशज रिचर्ड होळकर यांनी सामन्याआधी ड्रेसिंग रूमच्या पुढे लावण्यात आलेली पितळेची घंटा वाजवून सामना सुरू होत असल्याचे संकेत दिले.

Web Title: India's 'wicket' in the spinners net; Australia took control of the match on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.