( Marathi News ) - भारतीय क्रिकेटमध्ये सध्या इशान किशनच्या ( Ishan Kishan) नावाची चर्चा आहे. युवा यष्टिरक्षक-फलंदाजाने अल्पावधीतच मिळालेल्या संधीचं सोनं केलं. वन डे क्रिकेटमध्ये द्विशतकही झळकावलं. पण, जेवढ्या झटपट तो यशाच्या पायऱ्या चढला, तेवढ्याच वेगाने त्याच्या कारकीर्दिला उतरती कळा येतेय का अशा प्रश्न निर्माण झाला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर बाकावर बसवून ठेवल्यानंतर इशानने मानसिक थकवा सांगून सुट्टी मागीतली. BCCI ने ती मान्यही केली आणि त्यानंतरच्या अफगाणिस्तान मालिकेत यष्टिरक्षक-फलंदाजाची निवड केली गेली नाही. इशानवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते, परंतु मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने या वायफळ चर्चा असल्याचे स्पष्ट केले. मात्र, द्रविडने त्याचवेळी इशानला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्ला दिला होता.
द्रविडचा हा सल्ला इशानने मनावर घेतल्याचे दिसत नाही. भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान अजूनही देशांतर्गत स्पर्धा रणजी करंडक स्पर्धेसाठी झारखंड संघात परतलेला नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी BCCI इशानचा विचार करत आहे. कारण लोकेश राहुलवर त्यांना यष्टिरक्षण व फलंदाज अशी दुहेरी भूमिका सोपवायची नाही. पण, इशानला त्यालाशी रणजी करंडक स्पर्धेत खेळावे लागणार आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे सचिवांनी इशानने अद्यापही त्याच्या खेळण्याबाबत कळवले नसल्याचे म्हटले. तो जर आला तर त्याला थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पण, इशान नॉट रिचेबल आहे.
''इशानने अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही किंवा त्याच्या उपलब्धतेबाबत काही कळवलेले नाही. जेव्हा तो आम्हाला सांगेल, तेव्हा त्याला थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश मिळेल,''असे JSCA चे सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी सांगितले. इशानने ३२ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत ७९६ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मैदानावरील ट्वेंटी-२० मालिकेत ५ पैकी ३ सामन्यांत तो खेळला आणि पहिल्या दोन सामन्यांत अर्धशतकं झळकावली. तिसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला आणि त्यानंतर तो संघाबाहेरच आहे.
Web Title: India's wicketkeeper-batsman Ishan Kishan is yet to show up to play for the Jharkhand team in Ranji Trophy 2024
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.