- किशोर बागडे
(थेट ईडन गार्डनवरुन)
कोलकाता : विश्वचषकातील दोन मातब्बर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार असलेल्या ईडन गार्डनवर रविवारी वनडे विश्वचषकाच्या साखळी फेरीत आमने-सामने येणार आहेत. यानिमित्ताने दोन्ही संघांतील फॉर्ममध्ये असलेल्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार.
रोहितला विजयरथ पुढे रेटायचा असून, ३५ व्या वाढदिवशी कोहलीकडून विराट खेळी अपेक्षित आहे. त्यासाठी प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर पूर्ण वर्चस्व गाजवावेच लागेल. ६५ हजार प्रेक्षक क्षमतेच्या या मैदानावर भारताची उपांत्य सामन्याआधी ही अखेरची परीक्षा असेल. रोहित आणि विराटने प्रत्येकी एक शतकी खेळी केली असून, दुसरीकडे क्विंटन डीकॉकने चार शतके ठोकली.
एडेन मार्कराम आणि हेन्रिक क्लासेन यांनीही शतकी धडाका केला आहे. भारताने पाठोपाठ सात सामने जिंकले. दुसरीकडे एक सामना गमाविणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने सहा विजयांसह धावगतीत प्रगती केली. द. आफ्रिकेचा मारा प्रभावी आहेच, पण भारतीय गोलंदाजही कमी नाहीत.
मोहम्मद शमी आणि सिराजने तर कमाल केली. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव सामना फिरविण्यात तरबेज मानले जातात. क्विंटन डीकॉक, एडेन मार्कराम, हेन्रिक क्लासेन यांना रोखण्यासाठी या सामन्यातदेखील भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह उतरेल, यात शंका नाही.
‘प्रिन्स ऑफ कोलकाता’अशी ओळख असलेल्या दादा ऊर्फ सौरव गांगुलीच्या या शहरात सर्वत्र किंग कोहलीचीच क्रेझ पाहायला मिळते. बंगालच्या अनेक शहरांशिवाय बिहार, ओडिशा, दिल्ली, मुंबईसह नागपुरातूनही चाहते आले आहेत. त्याच्या बॅटमधून आणखी एक शतकी खेळी पाहण्याची सर्वांची इच्छा आहे. विराटची १८ नंबरची जर्सी चोहीकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच अनेक चाहते तिकिटाअभावी मैदानाबाहेरच विराटचा वाढदिवस साजरा करण्याचा बेत आखत आहेत. त्याचवेळी मैदानाच्या आत होणारा विशेष लेझर शो आणि आतषबाजी याला मात्र मुकावे लागेल, अशी खंत अनेक चाहत्यांनी व्यक्त केली.
भारत हरल्यास चोकर्स म्हणाल का?
भारताविरुद्ध चोकर्स (दडपणात गुडघे टेकणारा संघ) होण्यापासून बचावासाठी काय डावपेच आहेत, असे विचारताच माध्यमांशी संवाद साधताना द. आफ्रिकेचा कर्णधार तेम्बा बावुमा म्हणाला, ‘फॉर्ममध्ये असलेले संघ आमनेसामने असतील. मग भारत हरल्यास चोकर्स म्हणाल का? कुठल्या दिवशी कोणता संघ चांगला खेळतो, हा खरा प्रश्न आहे. दडपणाचे अनेक क्षण आले. त्यावर मात करीत इथपर्यंत आलो. या विश्वचषकात चोकिंगसारखा शब्द ऐकलेला नाही. कामगिरीच्या बळावर आम्ही दावेदारांच्या शर्यतीत दाखल झालो आहोत.’ संघ संयोजन कसे असेल, असे विचारताच बावुमाने गरजेनुसार दोन फिरकीपटू खेळविण्याचे संकेत दिले.
फार दूरचा विचार करीत नाही
भारत वि. द. आफ्रिका सामना फायनलची रंगीत तालीम असल्याचे मी मानत नाही. अहमदाबादला फायनल खेळण्याआधी तीन सामने खेळायचे आणि जिंकायचे आहेत. एकावेळी एका सामन्याचाच आम्ही विचार करतो. आम्ही पाच गोलंदाजांसह उतरणार आहोत. त्यात तीन वेगवान गोलंदाजांसह रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे फिरकी गोलंदाज असतील. जडेजा प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट असून कुलदीपदेखील प्रभावी मारा करीत आहे. - राहुल द्रविड, कोच, टीम इंडिया
तपास बोमकेश बक्षींकडे सोपवा : तिवारी
दरम्यान, ऑनलाइन बुकिंग फ्रॉडवरून बंगालचे क्रीडा राज्यमंत्री आणि माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी कॅबवर चांगलेच तोंडसुख घेतले. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘सर्वसाधारण चाहते नाराज आहेत. सर्व प्रयत्न करूनही त्यांना तिकीट मिळू शकले नाही, मग तिकिटे गेली कुठे? याचा शोध आता बोमकेश बक्षीच (प्रसिद्ध डिटेक्टिव्ह) घेऊ शकतील. त्यांच्याकडे तपास सोपवायला हवा!’
कोहलीच्या वाढदिवसाची ईडनवर जय्यत तयारी
चैतन्य आणि आक्रमकता काय असते हे दाखवून देणारा दिग्गज फलंदाज विराट कोहली रविवारी ३५ वर्षांचा होत आहे. याच दिवशी ईडन गार्डनवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे विश्वचषकाचा साखळी सामना रंगणार असल्याने भारतीय संघ आणि कोहली यांच्यासाठी हा सामना अविस्मरणीय असेल. कोहलीचा वाढदिवस आणखी खास बनविण्यासाठी ईडन गार्डन स्टेडियमवर खास तयारी केली जात आहे. विराटने ४९ वे शतक झळकवून चाहत्यांना वाढदिवसाची भेट द्यावी, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली.
कॅबकडून खास व्यवस्था
ऐतिहासिक ईडनवर कोहलीचा ‘विराट’ जन्मदिवस साजरा करण्यासाठी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने खास तयारी केली. सामन्याच्या तयारीदरम्यान कोहलीच्या वाढदिवसाचीही तयारी म्हणून कॅबने विशेष केक बनविला आहे. हा केक सामना सुरू होण्याआधी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये कापला जाईल. याशिवाय या चॅम्पियन खेळाडूला विशेष बॅट भेट दिली जाईल.
७० हजार मुखवटे देण्यास विरोध
कोहलीच्या चेहऱ्याचे ७० हजार मुखवटे प्रेक्षकांना वाटण्याचा कॅबचा विचार होता. बीसीसीआयने परवानगी नाकारताच प्लॅन बदलण्यात आला. यामुळे कोहलीच्या मुखवट्यांऐवजी त्याचे पोस्टर्स प्रेक्षकांकडे दिसतील, असा विश्वास कॅबचे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांनी व्यक्त केला.
अमित शाह येणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सामन्याला हजेरी लावणार आहेत. कॅबने त्यांना आमंत्रण दिले असून ते त्यांनी स्वीकारले. त्याचवेळी महानायक अमिताभ बच्चन यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते, मात्र प्रकृती बरी नसल्याने त्यांनी नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी कर्णधार सौरव गांगुली आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांचीही ईडनवर उपस्थिती राहणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स हा आयसीसी चषक मैदानावर आणेल.
Web Title: India's Win will also run on Eden! All set to crush South Africa's challenge: 'Birthday boy' Virat Kohli's performance in action
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.