Join us  

भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, मालिकेवर 4-1नं मिळवला कब्जा

एकतर्फी झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. भारतानं मालिकेवर 4-1नं विजय मिळवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2017 8:50 PM

Open in App

नागपूर - एकतर्फी झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवून मालिकेवर 4-1नं कब्जा मिळवला आहे. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 42.5 षटकांमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात 243 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. रोहित शर्माच्या शतकी खेळीमुळे भारतानं सामन्यावर कब्जा मिळवला. रहाणेनंही अर्धशतकी खेळी केली. रोहित शर्मानं शानदार फलंदाजी करत 109 चेंडूंत 5 षटकार व 11 चौकारांसह 125 धावांची शतकी खेळी केली. रहाणेनं 74 चेंडूंत 7 चौकारांसह 61 धावा केल्यात. तर कर्णधार विराट कोहलीनं 39 धावा कुटल्या आहेत. शर्मा आणि रहाणेनं केलेल्या 124 धावांच्या भागीदारीमुळे भारतानं सामन्यावर विजय मिळवत मालिका 4-1नं खिशात घातली आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियानंही दमदार खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय गोलंदाजांची त्यांच्या धावसंख्येला लगाम घातला होता. सलामीवीर वॉर्नर व अॅरॉन फिंच यांच्या 66 धावांच्या अर्धशतकी खेळीनं सुरुवातीला ऑस्ट्रेलियानं डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांना माघारी धाडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव काहीसा गडगडला. पटेलनं पांडेकरवी वॉर्नरला झेलबाद केलं. त्यानंतर पांड्यानंही फिंचचा बळी मिळवला. सलामीवीर अॅरॉन फिंचची (32) विकेट काढत भारताने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला होता. फिंच बाद झाल्यावर स्टिव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर माघारी परतले. त्यानंतर मैदानावर आलेला हँड्सकॉम्बही 13 धावा काढून तंबूत परतला. तर ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड 42 धावा काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरनं 62 चेंडूंत 5 चौकारांसह 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. परंतु इतर कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला फारशी चमक दाखवता आली नाही.ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी धडाधड बळी टाकले होते. त्यात भारताकडून पटेल आणि बुमराहनं सर्वाधिक बळी मिळवले होते. पटेलनं वॉर्नर, हँड्सकॉम्ब, हेड यांना माघारी धाडलं होतं, तर बुमराहनं वेड आणि स्टोइनिसला मैदानावरून घरी पाठवलं होतं. ऑस्ट्रेलियाकडून स्टोइनिस व हेडनं 87 धावांची भागीदारी केली होती.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघक्रिकेट