दाम्बुला : गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर शिखर धवनचे तडाखेबंद शतक आणि कर्णधार विराट कोहलीचा जबरदस्त तडाखा या जोरावर टीम इंडियाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी देताना यजमान श्रीलंकेचा ९ गडी राखून धुव्वा उडवला. श्रीलंकेने दिलेल्या २१७ धावांचा पाठलाग करताना भारताने २८.५ षटकांतच केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात २२० धावा काढल्या.रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या या सामन्यात ‘गब्बर’ शिखर धवनने पुन्हा एकदा लंकेच्या गोलंदाजांची पिसे काढताना ७१ चेंडूंत शतक झळकावण्याची कामगिरी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या रोहित शर्माकडून भारताला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. परंतु, धाव घेताना झालेल्या चुकीमुळे रोहित कपुगेदराच्या अचूक फेकीवर धावचित झाला. त्याने १३ चेंडूंवर केवळ ४ धावा केल्या. या वेळी, यजमान सहजासहजी हार पत्करणार नाही, असे दिसत होते.परंतु, धवन आणि त्याच्या साथीला आलेल्या कोहलीने सामन्याचा निकाल स्पष्ट करताना लंकेची तुफान धुलाई केली. धवनने केवळ ९० चेंडूंत २० चौकार व ३ षटकार ठोकताना नाबाद १३२ धावांचा तडाखा दिला. दुसरीकडे, कोहलीने वाहत्या गंगेत हात धुऊन घेताना ७० चेंडूंत १० चौकार व एका षटकारासह नाबाद८२ धावांचा चोप दिला. अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाच्या पुनरागमनाने लंकेच्या गोलंदाजीला धार येईल, अशी अपेक्षा होती. परंतु, मलिंगाची गोलंदाजी पुरेपूर जाणून असलेल्या भारतीयांनी त्याला ६.५० च्या धावगतीने चोपत त्याच्या ८ षटकांत ५२ धावा वसूल केल्या. लंकेचा एकही गोलंदाज विशेष छाप पाडू शकला नाही.नाणेफेकीचा कौल जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. परंतु, निरोशन डिकवेला (६४) आणि दानुष्का गुणतिलका (३५) यांनी ७४ धावांची अर्धशतकी सलामी देत कोहलीचा निर्णय चुकीचा ठरविण्याचा प्रयत्न केला. यानंतर कुशल मेंडिसने (३६) डिकवेलाला चांगली साथ देत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, केदार जाधवने डिकवेलाचा अडसर दूर केल्यानंतर लंकेचा डाव कमालीचा घसरला. डिकवेला बाद झाला तेव्हा लंका संघ २ बाद १३९ धावा अशा समाधानकारक स्थितीमध्ये होता.यानंतर, भारतीय फिरकीपटूंनी भेदक मारा करीत पुढील ६ बळी केवळ ३९ धावांमध्ये मिळवत लंकेची एक बाद १३९ वरून ७ बाद १७८ धावा अशी अवस्था केली. या वेळी अत्यंत दबावाखाली आलेल्या यजमानांनी कसेबसे दोनशेपलीकडे मजल मारण्यात यश मिळवले ते माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजमुळे. मॅथ्यूजने ५० चेंडूंत १ चौकार व एका षटकारासह नाबाद ३६ धावांची संयमी खेळीकेली. भारताकडून अक्षर पटेलने ३,तर जसप्रीत बुमराह, यजुर्वेंद्रचहल आणि केदार जाधवयांनी प्रत्येकी २ बळी घेत लंकेला गुंडाळले. (वृत्तसंस्था)सध्या सर्वकाही माझ्यासाठी सकारात्मक घडत आहे आणि मी केवळ माझ्या कामगिरीत सातत्य राखण्यावर लक्ष देत आहे. मानसिकरीत्या मी कोणत्याही दबावाखाली नसून जेव्हा आपण चांगले प्रदर्शन करत असतो तेव्हा आपल्याकडे अतिरिक्त आत्मविश्वास असतो.- शिखर धवन,फलंदाज (भारत)धवनने श्रीलंकेमध्ये खरंच चांगली सुरुवात केली होती. आम्हाला श्रीलंकेकडून ३०० च्या आसपास लक्ष्य मिळेल, अशी अपेक्षा होती. येथील खेळपट्टी फलंदाजीला अत्यंत पूरक होती. तसेच, दुसºया डावात फलंदाजी करतानाही ही खेळपट्टी फलंदाजांना फायदेशीर ठरणारी होती. धवनसाठी मागील तीन महिने शानदार राहिले आणि त्याने या दौºयाचा पूर्ण फायदा घेतला. त्याच्या कामगिरीतील हेच सातत्य कायम राहील, अशी अपेक्षा आहे. याच जोरावर तो संघासाठी अनेक सामने जिंकून देईल. २०१९ च्या विश्वचषकाची तयारी म्हणून आम्ही संघात काही प्रयोग करू. यामध्ये अनेक बदल दिसून येतील आणि सर्वच खेळाडूंना समान संधी मिळेल.- विराट कोहली, कर्णधार (भारत)आमची सुरुवात शानदार झाली, परंतु त्याचा फायदा घेण्यात आम्हाला अपयश आले. आमची मधली फळी पूर्णपणे कोलमडली. एकवेळ आम्ही ३०० धावा फलकावर लावण्याचा विचार करत होतो. मात्र, जेव्हा अशी योजना केलेली असताना किमान एका फलंदाजाला मोठी खेळी करणे आवश्यक असते. आम्हाला आमच्या चुकांपासून शिकावे लागेल. कोणालातरी मोठी खेळी खेळावी लागेल, तसेच गोलंदाजांनाही लयीमध्ये यावे लागेल.- उपुल थरंगा, कर्णधार (श्रीलंका)नंबर गेम७१ चेंडूंत शतक पूर्ण करीत शिखर धवनने कारकिर्दीतील सर्वात वेगवान ‘सेन्चुरी’ ठोकली. यापूर्वी, कानपूर येथे २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ७३ चेंडूंत त्याने शतक फटकावले होते. त्याची नाबाद १३२ धावा ही दुसरी सर्वाेच्च धावसंख्या आहे. द. आफ्रिकेविरुद्ध २०१५ मध्ये विश्वचषकात त्याने १३७ धावा केल्या होत्या.१२७ चेंडू शिल्लक ठेवत भारताने सामना जिंकला. २०० आणि त्यापेक्षा अधिक धावसंख्या असताना मिळवलेला हा चौथा विजय आहे. यापूर्वी २०१४ मध्ये एजबॅस्टन येथे ११७ चेंडू शिल्लक ठेवत इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला होता.७७ धावांसाठी श्रीलंकेने त्यांचे ९ गडी गमावले. २५ व्या षटकात त्यांची स्थिती १ बाद १३९ अशी होती. अशीच स्थिती दोन वेळा झाली होती. भारताविरुद्धच त्यांची ही सर्वात दयनीय स्थिती होती.१६ धावांसाठी श्रीलंकेने सहा फलंदाज गमावले. भारताविरुद्ध हीसुद्धा सर्वात वाईट कामगिरी राहिली. श्रीलंकेचे फलंदाज १, २, ०, ५, ८, ० अशा धावांवर बाद झाले.१९७ धावांची भागीदारी धवन आणि कोहली यांनी केली. ही दुसºया गड्यासाठी केलेली श्रीलंकेतील सर्वाेत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी महेंद्रसिंह धोनी आणि गौतम गंभीर यांनी २००९ मध्ये १८८ धावांची भागीदारी केली होती.धावफलक :श्रीलंका : निरोशन डिकवेला पायचित गो. केदार ६४, दानुष्का गुणतिलका झे. राहुल गो. चहल ३५, कुशल मेंडिस त्रि. गो. पटेल ३६, उपुल थरंगा झे. धवन गो. केदार १३, अँजेलो मॅथ्यूज नाबाद ३६, चमारा कपुगेदरा धावबाद (कोहली) १, वनिंदू हसरंगा डिसिल्व्हा झे. केदार गो. पटेल २, थिसारा परेरा त्रि. गो. बुमराह ०, लक्षण संदाकन पायचित गो. पटेल ५, लसिथ मलिंगा यष्टिचित धोनी गो. चहल ८, विश्वा फर्नांडो त्रि. गो. बुमराह ०. अवांतर : १६. एकूण : ४३.२ षटकांत सर्व बाद २१६ धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ६-०-३३-०; हार्दिक पांड्या ६-०-३५-०; जसप्रीत बुमराह ६.२-०-२२-२; यजुर्वेंद्र चहल १०-०-६०-२; केदार जाधव ५-०-२६-२; अक्षर पटेल १०-०-३४-३.भारत : रोहित शर्मा धावचित (कपुगेदरा) ४, शिखर धवन नाबाद १३२, विराट कोहली नाबाद ८२. अवांतर : २. एकूण : २८.५ षटकांत १ बाद २२० धावा. गोलंदाजी : लसिथ मलिंगा ८-०-५२-०; विश्वा फर्नांडो ६-०-४३-०; अँजेलो मॅथ्यूज २-०-९-०; थिसारा परेरा २-०-१८-०; लक्षण संदाकन ६-०-६३-०; वनिंदू हसरंगा डिसिल्व्हा ४.५-०-३५-०.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारताचा दणदणीत विजय : धवनचे आक्रमक जलद शतक, श्रीलंकेचा ९ गडी राखून पराभव
भारताचा दणदणीत विजय : धवनचे आक्रमक जलद शतक, श्रीलंकेचा ९ गडी राखून पराभव
गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर शिखर धवनचे तडाखेबंद शतक आणि कर्णधार विराट कोहलीचा जबरदस्त तडाखा या जोरावर टीम इंडियाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी देताना यजमान श्रीलंकेचा ९ गडी राखून धुव्वा उडवला. श्रीलंकेने दिलेल्या २१७ धावांचा पाठलाग करताना भारताने २८.५ षटकांतच केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात २२० धावा काढल्या.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 2:14 AM