बंगळुरू : सलग तीन विजय नोंदवीत पाच सामन्यांची मालिका आधीच जिंकणारा भारतीय संघ गुरुवारी येथे खेळल्या जाणा-या चौथ्या सामन्यात पुन्हा एकदा आॅस्ट्रेलियाला पराभवाची चव चाखवीत ‘व्हाईटवॉश’साठी एक पाऊल पुढे टाकण्याच्या निर्धाराने खेळणार आहे.
कर्णधार विराट कोहलीचा युवा व तंदुरुस्त संघ सध्या क्रिकेटचा ‘सुवर्णकाळ’ अनुभवतो आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर यजमान खेळाडूंच्या कालच्या सरावातही पाहुण्यांना कोंडीत पकडायचेच, हा निर्धार दिसून आला. कोहलीसोबत महेंद्रसिंग धोनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत असून, हार्दिक पांड्याच्या रूपाने टीम इंडियाला ‘हरहुन्नरी’ खेळाडू लाभला. पांड्याने पहिल्या सामन्यात आक्रमक ८३ धावा ठोकल्यानंतर इंदूरमध्ये ७८ धावांची खेळी करताच भारताने २९४ धावांचे लक्ष्य ५ गड्यांच्या मोबदल्यात गाठले होते. रोहित शर्मा-अजिंक्य रहाणे हे सलामीवीरांची भूमिका चोखपणे बजावीत आहेत. गरजेच्या वेळी केदार जाधव आणि मनीष पांडे धावून येतातच. बंगळुरू येथे लोकेश राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे.
फलंदाजी ही यजमान भारताची प्रमुख ताकद असली तरी गोलंदाजही आता मागे राहिले नाहीत. भुवनेश्वर कुमार किंवा जसप्रीत बुमराह यांचा वेगवान मारा असो वा यजुवेंद्र चहल-कुलदीप यादव ही फिरकी जोडी, सर्वच गोलंदाजांनी शानदार कामगिरीद्वारे लक्ष वेधले आहे. या गोलंदाजांनी अश्विन-जडेजा यांची उणीव भासू दिली नाही. प्रत्येक फलंदाज संघाला संकटातून बाहेर काढण्यात यशस्वी ठरला. आघाडीची फळी अपयशी ठरली की मधल्या आणि तळाच्या फळीने स्वत:ची जबाबदारी ओळखून खेळ केला आहे. पांड्याने स्वत:च्या कामगिरीने प्रतिस्पर्धी गोटात भीतीचे वातावरण निर्माण केले.
दुसरीकडे, विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाला यानंतर अॅशेस मालिकेला सामोरे जायचे असल्याने, अखेरचे दोन सामने जिंकून संघात चैतन्य निर्माण करणे गरजेचे आहे. या संघाला विदेशात सलग ११ पराभवास सामोरे जावे लागले. भारताला रोखण्यासाठी काय डावपेच आखायचे, ही संघापुढील मुख्य चिंता आहे. ‘बिग हिटर’ ग्लेन मॅक्सवेलसारखा फलांज अपयशी ठरत आहे. अशावेळी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांच्यावरच भिस्त असेल. या सामन्यावरही पावसाचे सावट राहील, असे हवामान खात्याने भाकीत केले आहे. (वृत्तसंस्था)
उभय संघ
यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, रवींद्र्र जडेजा आणि लोकेश राहुल.
आॅस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, हिल्टन कार्टराईट, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस् स्टोयनिस, मॅथ्यू वेड, अॅश्टन एगर, केन रिचर्डसन, पॅट कमिन्स, नाथन कूल्टर नाईल, अॅरोन फिंच, पीटर हॅन्डस्कोम्ब, जेम्स फॉल्कनर आणि अॅडम झम्पा.
नव्या विक्रमाची संधी
सुमारे दहा वर्षांपूर्वी भारताने सलग ९ एकदिवसीय सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. बंगळुरुमध्ये आॅसीला नमवून हाच विक्रम मागे टाकण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. आॅस्टेÑलियाने सलग १० सामने जिंकण्याचा पराक्रम ६ वेळा केला आहे.
सामना : दुपारी १.३० पासून स्थळ : एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू
Web Title: India's winning streak today, India ready to give 'Dhobi Pachad' to Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.