दुबई : भारताची युवा फलंदाज शेफाली वर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिला टी-२० फलंदाजी रँकिंगमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले. ही १७ वर्षीय फलंदाज गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान अव्वल स्थानी पोहचली होती. तिने आता २३ व ४७ धावांच्या खेळी करीत ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी हिला पिछाडीवर सोडले.
दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लिजेल लीच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे, पण एकदिवसीय रँकिंगमध्ये तिने एका आठवड्यानंतरच अव्वल स्थान गमावले होते. इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट अव्वल स्थानी आहे. ली हिने गेल्या लढतीत ७० धावांची खेळी केली होती. ती टी-२० क्रमवारीमध्ये ११ व्या स्थानी दाखल झाली आहे. दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोलवार्टने पाच स्थानांची प्रगती करीत २४ वे स्थान गाठले. दीप्ती शर्माने चार स्थानांच्या प्रगतीसह ४० वे, तर ऋचा घोषने ५९ स्थानांच्या प्रगतीसह ८५ वे स्थान गाठले आहे. अष्टपैलू हरलीन देओल फलंदाजीमध्ये ९९ व्या तर गोलंदाजीमध्ये १४६ व्या स्थानी आहे.
एकदिवसीय रँकिंगमध्ये बदल झाले आहे. भारतीय कर्णधार मिताली राज एका स्थानाची प्रगती करीत आठव्या स्थानी आली आहे. गोलंदाजीमध्ये गायकवाड ३८ व्या स्थानी आहे.