नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) आगामी मोसमासाठी केलेल्या केंद्रीय करारातून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला वगळले आहे. गुरुवारी वार्षिक करारबद्ध केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. महेंद्रसिंग धोनी याला या करारात कुठेही स्थान देण्यात आलेले नाही.
या करारात विराट कोहली, रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह या तिघांना वर्षाला सात कोटी रुपये देऊ न करारबद्ध करण्यात आले आहे. याखेरीज इतर अनेक खेळाडूंना वेगवेगळ्या श्रेणीत करारबद्ध केले आहे. अपवाद केला आहे तो केवळ धोनीचा. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांची निराशाच झाली आहे. गेल्या वर्षी धोनीला अ श्रेणीत स्थान देण्यात आले होते. पण यंदा त्याला कोणत्याही श्रेणीत स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता धोनीने निवृत्ती घ्यावी, असा अप्रत्यक्षपणे संदेश देण्यात आला आहे. बीसीसीआयच्या वार्षिक कराराचे चार भाग आहेत. त्यात ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार विभागात हा करार झाला आहे.सात महिन्यांपासून मैदानाबाहेरधोनी ९ जुलै रोजी झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक उपांत्य लढतीनंतर सामना खेळला नव्हता. बीसीसीआयने ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० पर्यतच्या केंद्रीय कराराची घोषणा केली. धोनीला वगळण्याबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, कारण तो स्वत:च्या भविष्याबाबत कुठलाच खुलासा करताना दिसत नाही. प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही आयपीएलवर लक्ष केंद्रित करण्यासाठी धोनी लवकरच निवृत्ती जाहीर करू शकतो, अशी माहिती दिली होती.