नवी दिल्ली : भारत आणि बांगला देश यांच्या दरम्यान ३ नोव्हेंबरला फिरोजशाह कोटलामध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यापूर्वी राष्ट्रीय राजधानीतील वाढते प्रदूषण चिंतेचा विषय आहे.
डिसेंबर २०१७ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाला कोटलामध्ये कसोटी सामन्यादरम्यान अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे अनेक खेळाडूंना मास्क घालून खेळावे लागले होते. त्यानंतरही काही खेळाडू आजारी पडले होते.
बीसीसीआयची रोटेशन नीती आणि पाहुणा संघाचा दौरा कार्यक्रम बघता बीसीसीआयने पहिली लढत दिल्लीमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. दिवस-रात्र लढतीत शहरातील खराब वातावरण चिंतेचा विषय ठरेल, असे त्यांना वाटले नव्हते. पण, दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी वायू गुणवत्ता सूचकांक (एक्यूआय) खराब दिसत आहे. एक्यूआयच्या निकषानुसार ०-५० चांगला, ५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० मध्यम पातळीचा, २०१ ते ३०० खराब, ३०० ते ४०० अतिशय खराब आणि ४०० पेक्षा अधिक गंभीर मानले जाते. त्याचा प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
आता मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दिल्ली विद्यापीठाचा एक्यूआय ३५७ होता. तो अतिशय खराब मानला जातो.बीसीसीआय व डीडीसीएचे अधिकारी म्हणाले की, खराब वायू प्रदूषणावर आमचे नियंत्रण नाही आणि सामना दिवाळीच्या एक आठवड्यानंतर असता तर तेव्हापर्यंत स्थिती नियंत्रणात आली असती. बीसीसीआयचे एक सिनिअर अधिकारी म्हणाले, ‘आम्हाला दिवाळीनंतर दिल्लीच्या प्रदूषणाची कल्पना आहे; पण सामना एक आठवड्यानंतर हवा होता. त्यामुळे खेळाडूंना प्रकृतीबाबत कुठली अडचण आली नसेल, अशी आशा आहे.’ श्रीलंका सामन्यानंतर चुकीचा प्रचार व वाईट अनुभवाबाबत प्रश्न उपस्थित होतो की, बीसीसीआय दिल्लीबाबत आपल्या रोटेशन नीतीवर का कायम राहिली.
अधिकारी म्हणाले, ‘ बांगला देश संघ थेट दिल्लीला दाखल होईल आणि कोलकाताहून मायदेशी परतेल. आम्ही त्यांचा प्रवास सुखकर बनविण्यास इच्छुक होतो. त्यामुळे उत्तरेतून सुरुवात होत पश्चिमेतून (नागपूर, राजकोट आणि इंदूर) पूर्वेमध्ये (कोलकाता) संपेल, याची काळजी घेण्यात आली.’ बांगला देश संघाला आपल्यासोबत मास्क ठेवण्याची विनंती करण्यात येऊ शकते.गंभीरच्या जागी मनिंदर सिंगअतिरिक्त महाधिवक्ता व सर्वोच्च न्यायालयाचे सिनिअर वकील मनिंदर सिंग दिल्ली अॅन्ड जिल्हा क्रिकेट समितीच्या (डीडीसीए) कार्यकारिणीमध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या जागी सरकारकडून मानांकित सदस्याचे स्थान घेतील. गंभीरने अलीकडेच राजीनामा दिला होता. कारण तो आता खासदार असून, लोढा समितीच्या शिफारशींच्या विरोधात आहे.