सिडनी : ऑस्ट्रेलियामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे, हे तुम्हाला माहिती असेल. पण आता इनडोअर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजनही ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात येणार आहे.
इनडोअर क्रिकेट विश्वचषक स्पर्धा होणार आहे, हे बऱ्याच जणांना माहितीही नसेल. ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात १० ते १७ या कालावधीमध्ये खेळवण्यात येणार आहे. मेलबर्न येथील कॅसी स्टेडियम आण सिटी पॉवर सेंटर येथे विश्वचषकाचे सामने खेळवण्यात येणार आहेत.
विश्व इनडोअर क्रिकेट महासंघाने आज या गोष्टीची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, " यंदाची इनडोअर क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषकासाठी मेलबर्नमधील दोन स्टेडियम सज्ज झाली आहेत. ही स्पर्धा १० ते १७ ऑक्टोबर या कालावधीमध्ये रंगणार आहे."
इनडोअर क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०१७ साली दुबईमध्ये खेळवली गेली होती. यावेळी ऑस्ट्रेलियाने जेतेपदाला गवसणी घातली होती. आतापर्यंत २५ वर्षे इनडोअर क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली जात आहे. पण या २५ वर्षांमध्ये एकदाही ऑस्ट्रेलिया पराभूत झाली, असे झालेले नाही.
इनडोअर क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही चार विभागांमध्ये खेळवली जाते. २१-वर्षांखालील पुरुष आणि महिला या दोन गटांमध्ये ही स्पर्धा होते. त्याचबरोबर पुरुष आणि महिला (खुल्या) या दोन गटांमध्येही ही स्पर्धा होते.