अभिलाष खांडेकर
इंदोर : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या आवेश खान आणि व्यकंटेश अय्यर या दोन युवा चेहऱ्यांनी इंदोरचे नाव पुन्हा एकदा क्रिकेटच्या पटलावर आणले आहे. उदयोन्मुख क्रिकेटपंटूसाठीचे पाळणाघर अशी गेल्या अनेक दशकापासून इंदोरची ओळख आहे. या दोन क्रिकेटपटूंनी ही ओळख पुन्हा सार्थ ठरविली आहे.
आवेश खान आणि व्यकंटेश अय्यर या दोन गुणवान खेळाडूंनी इंदोरच्याच मैदानात क्रिकेट प्राथमिक धडे गिरवले आहेत. आवेशने आयपीलमध्ये दिल्लीकडून आणि अय्यरने कोलकाताकडून खेळाताना चमकदार कामगिरी केल्याने ते भारतीय संघात निवडीसाठी पात्र ठरले. गेल्या बऱ्याच काळापासून इंदोर शहरासाठी हा सुवर्णक्षण आला आहे. जेव्हा त्यांचे दोन खेळाडू एकाचवेळी भारताचे प्रतिनिधित्व करतील. विशेष म्हणजे एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या या खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले. आवेश खान तर दोनदा १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाचा सदस्य राहिलेला आहे.
आवेश खानच्या वडिलांचे पानाचे दुकान होते. मात्र आवेशने कमी वयातच आपल्या खेळाच्या जोरावर कुटूंबाची आर्थिक जबाबदारी उचलली. काही काळातच त्याने वडिलांनाही दुकान बंद करायला लावले. ‘लोकमत’शी बोलताना मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष संजीव राव म्हणाले, ‘‘इंदोर हे आधीपासूनच नवीन क्रिकेटपटूंना घडविण्यासाठी ओळखले जाते. अगदी सी. के. नाय़डूंच्या काळापासून इंदोरला ही ओळख मिळालेली आहे. त्यानंतरही इंदोरने नरेंद्र हिरवानी, नमन ओझा यांसारखे गुणवान क्रिकेटपटू भारताला दिले आहे.
व्यकंटेश अय्यरने कोलकाताकडून खेळताना आयपीएल-मध्ये अनेकांचे लक्ष वेधले होते. त्याने आयपीएलच्या १० सामन्यांमध्ये ३७० धावा फटकावल्या.
अय्यरच्या खेळीचे खुद्द सुनील गावसकर यांनीही तोंड भरून कौतुक केले होते. अय्यरसारख्या खेळाडूंमुळे भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल असल्याचेही गावसकर म्हणाले होते. व्यंकटेश अय्यर मध्य प्रदेशसाठी रणजी सामन्यांमध्ये सलामीवीराची भूमिका बजावत होता. मात्र काही काळाने त्याने मधल्या क्रमात फलंदाजी करणे पसंत केले. इंदोरच्या दोन्ही क्रिकेटपटूंच्या निवडीमुळे या भागातील अनेक गुणवान खेळाडूंना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात अनेक मोठे खेळाडू इंदोर शहरातून यायला लागले तर नवल वाटायला नको. कारण उदयोन्मुख खेळाडूंचे नंदनवन म्हणून इंदोर भारतीय क्रिकेटला परिचित आहेच.
जगदाळे यांनी हेरली आवेशची गुणवत्ता
‘आवेश आणि व्यंकटेश यांच्या भारतीय संघातील निवडीने सीके नायडू यांची शानदार परंपरा कायम राहिली असून इंदूरचे नाव पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये चमकले आहे,’ असे बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांनी सांगितले. आवेश खान याच्यातील गुणवत्ता जगदाळे यांनीच हेरली होती. आवेशच्या आतापर्यंतच्या वाटचालीत जगदाळे यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.
Web Title: Indore re-illuminates due to passion, Vyakantesh; Selected in the squad for the series against New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.