विशाखापट्टणम : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान भारतीय संघाने विजयी सलामी दिली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजय मिळवून 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दुसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 10 गडी राखून मात केली. अशा प्रकारे 3 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरी झाली आहे.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 26 षटकात सर्वबाद केवळ 117 धावा केल्या होत्या. डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 5 बळी घेऊन यजमानांची कंबर मोडली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 11 षटकांत एकही गडी न गमावता लक्ष्य गाठले. म्हणजेच अवघ्या 66 चेंडूत पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने सामना आपल्या नावावर केला. सलामीवीर फलंदाज मिचेल मार्शने 36 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकार मारून 66 धावांची नाबाद खेळी केली. तर 30 चेंडूत 51 धावा करून ट्रॅव्हिस हेडने ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
आनंद महिंद्रा यांचं सूचक ट्विट भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट केले आहे. "मला वाटले आज क्रिकेटचा सामना आहे, पण मला वाटते की मी स्वप्न पाहत असावे...", अशा शब्दांत आनंद महिंद्रा यांनी या सामन्यावर आपली प्रतिक्रिया दिली. वन डे सामना ट्वेंटी-20 सामन्याप्रमाणे झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे, तर भारतीय संघावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता 22 तारखेला अखेरचा आणि निर्णायक सामना पार पडणार आहे.
आपल्या घरातील सर्वात मोठा पराभव घरच्या मैदानावर विकेट्सच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी 2005 मध्ये दक्षिण आफ्रिकेने ईडन गार्डन्सवर भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता आणि 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाने वानखेडेवर भारताचा पराभव केला होता. लक्षणीय बाब म्हणजे टीम इंडियाने 9 सामन्यांनंतर घरच्या मैदानावर एक वनडे सामना गमावला आहे. मालिकेतील दोन्ही वन डे सामन्यांमध्ये भारतीय आघाडीचे फलंदाज पूर्णपणे अपयशी झाल्याचे पाहायला मिळाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"