यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाची कामगिरी पाहता हा वर्ल्ड कप आपलाच, असे सर्वांनाच वाटत होते. पण, ऑस्ट्रेलियासारखा चिवट संघ वर्ल्ड कप जिंकण्याची संधी अशी सहजासहजी सोडत नाही, हा इतिहास त्यांनी पुन्हा एकदा खरा ठरवला. ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने भारताला पराभूत केले आणि सहाव्यांदा वर्ल्ड कप उंचावला. १४० कोटी भारतीयांचे स्वप्न भंग झाले. देशभरात निराशाचे वातावरण पसरले. तर, भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्येही भयाण शांतता होती. काही खेळाडूंनी अश्रूंना वाट मोकळी केली. त्यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट ड्रेसिंग रुममध्ये जाऊन टीम इंडियाला धीर दिला. मोदींचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर सोशल मीडियातून प्रतिक्रिया येत आहेत.
नरेंद्र मोदींनी ड्रेसिंग रूममध्ये प्रत्येक खेळाडूशी चर्चा केली. यावेळी मोहम्मद शमी व रवींद जडेजा यांनी मोदींसोबतचा फोटोही पोस्ट केला आहे. मोहम्मद शमीने वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्या. त्याचं कौतुक करताना मोदींनी शमीला जवळ घेऊन पाठीवर थाप दिली. तसेच, रोहित व विराट यांना भेटून जय-पराजय होत असतो असे सांगितले. त्यानंतर मुख्य प्रशिरक्षक राहुल द्रविड यांचेही त्यांनी कौतुक केले. रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांच्यासोबत त्यांनी खास गुजरातीत गप्पा मारल्या. मोदी सर्व खेळाडूंना भेटले. यावेळी त्यांनी भारतीय संघाला दिल्लीत येण्याचे निमंत्रणही दिले.
मोदींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भारतीय संघाचे मनोबल वाढवताना मोदींनी दिलेल्या भेटीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. भाजपा नेते आणि समर्थक मोदींचा हा व्हिडिओ शेअर करत मोदींनी दाखवलेल्या आपलेपणाचं कौतुक करत आहेत. तर, पंतप्रधान कसा असावा याचं उदाहरण म्हणजे मोदी असेही ते म्हणत आहेत. या व्हिडिओवर उद्योगपती हर्ष गोएंका यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
''जेव्हा संघ निराश होतो, तेव्हा महान नेता प्रत्येकास प्रोत्साहन देऊन ताकद देतो. आपणास येणारे अडथळे पुढील यशाची नांदी आहेत, याची प्रत्येकाला आठवण करून देतो, असे म्हणत हर्ष गोएंका यांनी मोदींच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रसंगाचा व्हिडिओ शेअर करत मोदींनी दाखवलेल्या आपलेपणाचं कौतुक करताना, नेता हो तो मोदी जैसा...'' असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मोदींच्या या व्हिडिओला काही जणांकडून ट्रोलही केलं जात आहे.
Web Title: Industrialist Harsh Goenka's clear opinion on the viral video of Modi in the dressing room with team india
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.