मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाने शेवटच्या दिवशी विजय मिळवला. भारतीय संघाने कंगारूंवर 137 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन भूमिवर 2-1 अशा फरकासह मालिकेत आघाडी घेतली आहे. भारतीय संघाचा हा ऐतिहासिक विजय आहे. या कसोटीत भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे कंगारूंनी पळ काढल्याचे दिसले. त्यामुळेच 261 धावांवर ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडविण्यात विराट संघाला यश आलं. या विजयामुळे दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नववर्षाची भेटच टीम इंडियाने भारतीयांना दिली आहे.
भारतीय संघ चौथ्या दिवशीच विजय मिळवेल असे वाटत होते. त्यासाठी भारतीय संघाला अर्ध्या तासाचा अतिरिक्त वेळही खेळण्यास दिला, परंतु ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने भारताचा विजय पाचव्या दिवसावर लांबवला. 399 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 135 धावांवर माघारी परतला होता आणि खेळपट्टीची गोलंदाजांना मिळत असलेली साथ पाहता उर्वरित फलंदाज झटपट बाद होतील अशी शक्यता होता. पण, भारताला ऐतिहासिक विजयासाठी एक रात्र वाट पाहावी लागली. सामन्यातील अखेरच्या दिवशी टीम इंडियाने काही षटकांतच कंगारूंच्या उर्वरीत फलंदाजांना तंबूत धाडले. त्यामुळे 261 धावांवर ऑस्ट्रेलिय संघ गारद झाला. भारताने 137 धावांनी दुसरी कसोटी जिंकत मालिकाही जिंकली.
मेलबर्न कसोटीतील पाचव्या आणि अखेरच्या दिवशी सुरुवातीला पावसामुळे खेळ थांबविण्यात आला होता. मात्र, काही वेळातच खेळाला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियन संघाने 8 बाद 258 धावांवरुन खेळाला सुरुवात झाली. मात्र, ऑस्ट्रेलियन संघाच्या अवघ्या तीन धावा होताच, म्हणजेच 261 धावांवर पॅट कमीन्स बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर, पुढील षटकातच इशांत शर्माच्या गोलंदाजीवर नॅथन लायन बाद झाला अन् टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर 41 वर्षांनी ऑस्ट्रेलियन भूमिवर मालिकेत दोन कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम भारतीय संघाने नोंदवला आहे.