बांगलादेशने युवा (१९-वर्षांखालील) क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतावर मात करत जेतेपद पटकावले. या सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांबरोबर फलंदाजांनीही दमदार कामगिरी केली. पण संघातील एका खेळाडूवर कौटुंबिक जीवनात मोठी आपत्ती आली होती, पण ती बाजूला सारून तो विश्वचषकात आला आणि संघाला जेतेपद जिंकवून दिल्याचे पाहायला मिळाले.
बांगलादेशच्या युवा संघानं रविवारी 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास रचला. बांगलादेशनं युवा वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवून जेतेपद पटकावले. बांगलादेशनं प्रथम वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला.
यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. पण, तिलक ( 38) 29व्या षटकात माघारी परतला. त्यानंतर भारताचा डाव गडगडला. कर्णधार ध्रुव जुरेल ( 22) वगळता टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांना दुहेरी धाव करता आली नाही. यशस्वीनं फॉर्म कायम राखताना 121 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकाराच्या मदतीनं 88 धावा केल्या. पण, तो बाद झाला आणि टीम इंडियाचा डाव 4 बाद 156 वरून सर्वबाद 177 असा गडगडला.
लक्ष्याचा पाठलाग करताना परवेझ होसैन इमोन आणि तनझीद हसन यांनी अर्धशतकी सलामी दिली. पण, रवी बिश्नोईनं सामना टीम इंडियाच्या बाजूनं झुकवला. त्यानं 10 षटकांत 3 निर्धाव षटक टाकून 30 धावांत 4 विकेट्स घेतल्या. सामना विचित्र अवस्थेत असताना बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीनं नाबाद 47 धावांची खेळी करताना भारताचा पराभव निश्चित केला. पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेशसमोर 46 षटकांत 170 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने नाबाद 47 धावांची खेळी करत संघाला विश्वचषक जिंकवून दिला. अकबर विश्वचषकासाठी बऱ्याच दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला होता. कारण येथे बांगलादेशचा संघ सर्वात आधी सराव करण्यासाठी दाखल झाला होता. त्यामुळे घरी नेमकी काय परिस्थिती आहे हे त्याला माहिती नव्हते. २४ जानेवारीला अकबरच्या बहिणीचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला होता. पण देशासाठी विश्वचषक जिंकणे त्याच्या कुटुंबियांना महत्वाचे वाटले. त्यामुळे त्यांनी अकबरला ही गोष्ट सांगितली नव्हती.
याबाबत अकबरचे वडिल म्हणाले की, " अकबरला त्याची बहिण सर्वात जास्त प्रिय होती. त्यामुळे जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा ही बातमी आम्ही अकबरला दिली नव्हती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर अकबरने आम्हाला विचारले की, ही गोष्ट तुम्ही मला सांगितली का नाही? त्यावेळी अकबरला काय उत्तर द्यावे, हे आम्हाला खलत नव्हते. आम्ही त्यावेळी निशब्द झालो होतो."
Web Title: INDvBAN: Even after his sister's death, he played and won the World Cup for Bangladesh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.