मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या युवा (१९-वर्षांखालील) विश्वचषक स्पर्धा ऐन रंगात आली आहे. आता युवा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत थरार रंगणार आहे तो भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये. आज बांगलादेशने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. बांगलादेशच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत न्यूझीलंडला २११ धावांमध्ये रोखले. बांगलादेशकडून शोरिफूल इस्लामने सर्वाधिक तीन बळी मिळवले, तर शमीम होसेन आणइ हसन महराद यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. न्यूझीलंडकडून बेकहॅम व्हिलरने ७५ धावांची खेळी साकारली.
न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. कारण त्यांचे दोन्ही सलामीवीर ३२ धावंत तंबूत परतले होते. त्यामुळे बांगलादेशची २ बाद ३२ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर महमुद्दल हसन जॉयने १३ चौकारांच्या जोरावर १०० धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.