बांगलादेशच्या युवा संघानं रविवारी 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास रचला. बांगलादेशनं युवा वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवून जेतेपद पटकावले. बांगलादेशनं प्रथम वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. पण, त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीला गालबोट लागणारी घटना घडली. विजयाचा आनंद साजरा करताना बांगलादेशच्या खेळाडूंनी मैदानावर धाव घेतली आणि त्यावेळी त्यांनी भारतीय खेळाडूंना धक्काबुक्की केली.
विजयी धाव घेतल्यानंतर बांगलादेशचे खेळाडू मैदानावर धावून आले. त्यानंतर त्यांनी भारतीय खेळाडूंना धक्काबुक्की केली. यात बांगलादेशच्या झेंड्याचेही नुकसान झाले. पंचांच्या मधस्थीनंतर हा वाद सोडवण्यात आला. पण, सोशल मीडियावर बांगलादेशी खेळाडूंचे गैरकृत्य वाऱ्यासारखे व्हायरल झाले. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहीती समोर आलेली नाही, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) नं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं असून तपास सुरू केला आहे. या सामन्यानंतर बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीनं माफी मागितली. तो म्हणाला,'' जे घडलं, तसं घडायला नको हवं होतं. काय घडलं हे मलाही नेमकं माहीत नाही. मी कोणाला विचारलंही नाही, परंतु अंतिम सामन्यातील विजयानंतर भावनांचा बांध फुटला आणि खेळाडूंकडून नकळत चूक झाली. तसं व्हायला नको होतं. माझ्या संघाच्या वतीनं मी माफी मागतो.''
यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. पण, तिलक ( 38) 29व्या षटकात माघारी परतला. त्यानंतर भारताचा डाव गडगडला. कर्णधार ध्रुव जुरेल ( 22) वगळता टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांना दुहेरी धाव करता आली नाही. यशस्वीनं फॉर्म कायम राखताना 121 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकाराच्या मदतीनं 88 धावा केल्या. पण, तो बाद झाला आणि टीम इंडियाचा डाव 4 बाद 156 वरून सर्वबाद 177 असा गडगडला.
लक्ष्याचा पाठलाग करताना परवेझ होसैन इमोन आणि तनझीद हसन यांनी अर्धशतकी सलामी दिली. पण, रवी बिश्नोईनं सामना टीम इंडियाच्या बाजूनं झुकवला. त्यानं 10 षटकांत 3 निर्धाव षटक टाकून 30 धावांत 4 विकेट्स घेतल्या. सामना विचित्र अवस्थेत असताना बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीनं नाबाद 47 धावांची खेळी करताना भारताचा पराभव निश्चित केला. पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेशसमोर 46 षटकांत 170 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्ग यानंही बांगलादेशच्या खेळाडूंच्या सेलिब्रेशनवर नाराजी प्रकट केली. तो म्हणाला,''पराभव झाल्यानंतर आम्ही स्तब्ध होतो. जय-पराजय हा खेळाचा भागच आहे. पण, त्यांचं सेलिब्रेशन हे किळसवाणं होतं. ते त्या पद्धतीनं घडायला नको होतं.''
पाहा व्हिडीओ...