नागपूर - भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये काल खेळवला गेलेला दुसरा टी-२० सामना पावसामुळे ८ षटकांचा खेळवला गेला. सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताकडून डावातील पहिलं षटक हार्दिक पांड्याने टाकलं. मात्र अक्षर पटेलने टाकलेल्या डावातील दुसऱ्या षटकात पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीने सीमारेषेवर कॅमरून ग्रीनचा झेल सोडला. त्यानंतर रोहित शर्माने विराटला सीमारेषेवरून हटवले आणि ३० यार्डच्या सर्कलमध्ये तैनात केले. मात्र पुढच्याच चेंडूवर विराटने असं काही केलं की, कर्णधाराची बोलतीच बंद झाली.
विराटला ३० यार्डच्या सर्कलमध्ये आणल्यानंतर पुढच्याच चेंडूवर कॅमरून ग्रीनने मिडविकेटच्या दिशेने चेंडू टोलवला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. तिथे विराट कोहली उभा होता. त्याने चेंडूवर झडप घातली आणि चेंडू स्टम्पच्या दिशेने फेकत ग्रीनला ५ धावांवर धावचित केले. त्याबरोबरच विराटने ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून देण्याच्या ग्रीनच्या इराद्यांवर पाणी फिरवले.
विराटने हा थ्रो केला तेव्हा सुरुवातीला कॅमरून ग्रीन धावचित नसल्याचे दिसत होते. कारण विराटचा थ्रो थेट स्टम्पवर आला नव्हता. मात्र निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेल्यावर ग्रीन क्रिजमध्ये पोहोचण्यापूर्वीच यष्ट्या उडाल्याचे रिप्लेमध्ये दिसले. मग पंचांनी ग्रीन बाद असल्याचा इशारा करताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.