किशोर बागडे, उपमुख्य उपसंपादक
२००३ चा तो आठवा विश्वचषक आठवत असेल. २३ मार्चच्या त्या रविवारी जोहान्सबर्गच्या वाँडरर्स मैदानावर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताची अक्षरश: शिकार केली. २ बाद ३५९ धावांचा पाठलाग करणे नेहमीच कठीण असते आणि त्यातही ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यापुढे कर्णधार सौरव गांगुली, सचिन, युवराज सिंग यांच्यासाठी अशक्यच ठरले. ग्लेन मॅक्ग्रा आणि ब्रेट ली यांच्या भेदक माऱ्यापुढे अर्धा संघ ढेपाळला, तर ॲन्ड्रयू सायमंडन्स आणि ब्रॅड हॉग यांच्या फिरकीने तिघांना माघारी धाडले. फायनलआधी भारताने दोन सामने गमावले होते, तर ऑस्ट्रेलिया ओळीने दहा सामने जिंकून अंतिम फेरीत दाखल झाला होता.
भारतीय संघ अप्रतिम होता; पण कचखाऊ वृत्तीने घात केला. फायनलमध्ये भारताने तब्बल ८ गोलंदाज वापरले. तीन वेगवान गोलंदाजांनी २७ षटके टाकून २११ धावा मोजल्या. दोन्ही बळी मात्र हरभजननेच घेतले होते. भारतीय संघ २३४ धावांत गारद झाला आणि १२५ धावांनी फायनल हरला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडे सर्वोत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी आक्रमण होते. रिकी पाँटिंगसारखा चाणाक्ष कर्णधार होता.
यंदाच्या विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून सुरुवातीला पराभव झाल्यानंतर हा संघ जागा झाला. त्यांनी उपांत्य सामन्यासह सलग ८ सामने जिंकून फायनलमध्ये पाय ठेवला. सर्वोत्कृष्ट वाटचाल करणाऱ्या भारताविरुद्ध हा संघ जेतेपदासाठी झुंज देईल. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला वरचढ होऊ न देता खेळेल आणि जिंकेल, असे चाहत्यांना आतापासूनच वाटू लागले आहे. ऑस्ट्रेलियाकडून त्या पराभवाचा बदला घेण्याची भारताकडे २० वर्षांनंतर चांगली संधी आहे.
फलंदाज आणि गोलंदाज आतापर्यंत ज्या आक्रमक वृत्तीने वागले त्याची पुनरावृत्ती फायनलमध्ये व्हायला हवी. ऑस्ट्रेलियाचा वेगवान मारा फोडण्याची क्षमता भारताच्या आघाडीच्या आणि मधल्या फळीमध्ये आहेच. ॲडम झम्पा आणि ट्रॅव्हिस हेड यांचा फिरकी खेळण्याचे धारिष्ट दाखवावे लागेल. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मिशेल मार्श आणि मॅक्सवेलसारख्या धोकादायक फलंदाजांना अक्षरश: बांधून ठेवण्याचे कौशल्य भारतीय गोलंदाजांमध्ये निश्चितपणे आहे. भारत अंतिम सामना जिंकला तर एका विश्वचषकात सलग ११ विजयांच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाची बरोबरी करेल. २००३ व २००७ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने सर्व ११ सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे.
मोटेरावर गोलंदाज वरचढ
n अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल आहे. इथे चार सामने झाले. मात्र, अद्याप ३०० धावा निघालेल्या नाहीत.
n यंदाच्या विश्वचषकात २८६ धावांची सर्वोच्च खेळी ऑस्ट्रेलियाने केली. इंग्लंडला २८२ धावांत रोखणाऱ्या न्यूझीलंडने ३६ षटकांत २८३ धावा केल्या.
n पाकला १९१ धावांवर गारद करीत भारताने ३ बाद १९३ असे लक्ष्य गाठले, तर ऑस्ट्रेलियाने २८६ धावा उभारून इंग्लंडला २५३ धावांत बाद केले.
n अफगाणिस्तानला २४४ धावांवर बाद केल्यानंतर द. आफ्रिकेने ५ बाद २४७ धावा केल्या. हे पाहता भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाला २४० च्या वर धावा करू देणार नाहीत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
Web Title: IndvsAus: Now let's hunt down the Aussies; Take the year 2003
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.