India vs Australia, 3rd Test : पावसाच्या फलंदाजीनंतर सारे काही टीम इंडियाच्या विरोधात जाताना पाहायला मिळत आहे. भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) चौथ्या षटकातच ऑसींना धक्का दिला. त्यानंतर पावसाच्या आगमनानं बराचसा खेळ वाया गेला. पण, हा पाऊस जाता जाता टीम इंडियावर रुसून गेला. विश्रांतीनंतर सुरू झालेल्या खेळात सारे काही ऑस्ट्रेलियासाठी पोषक ठरले. रिषभ पंतकडून दोन सोपे झेल सुटले, जसप्रीत बुमराहकडून रन आऊट करण्याची संधी हुकली. तीन जीवदान मिळालेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर विल पुकोव्हस्कीनं ( Will Pucovski) ६९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून टीम इंडियाची नाचक्की केली.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला. १०० टक्के तंदुरुस्त नसतानाही डेव्हिड वॉर्नरला त्यांनी मैदानावर उतरवले. पण, सिरानजं त्याला पाच धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. चेतेश्वर पुजारानं स्लिपमध्ये सुरेख झेल टिपला. पदार्पणाचा सामना खेळणारा विल पुकोव्हस्की ( Will Pucovski) आणि मार्नस लाबुशेन यांनी यजमानांचा डाव सावरला. रिषभ पंतनं ( Rishabh Pant) दोन चुका करताना टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली. त्यात भर म्हणजे बुमराहकडून पुकोव्हस्कीला धावबाद करण्याची संधीही हुकली.
पुकोव्हस्कीनं आत्मविश्वासानं भारतीय गोलंदाजांचा सामना केला. आर अश्विनच्या गोलंदाजीवर रिषभनं यष्टींमागे सोपा झेल टाकला. त्यावेळी पुकोव्हस्की २६ धावांवर खेळत होता. पुकोव्हस्कीनं जीवदानानंतर खणखणीत चौकार मारून लाबुशेनसोबत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. पुढच्याच षटकात सिराजच्या गोलंदाजीवर रिषभनं आणखी एक झेल सोडला. याहीवेळेस त्यानं पुकोव्हस्कीला जीवदान दिले. २९व्या षटकात तिसरी धाव घेण्यासाठी पुकोव्हस्की खेळपट्टीच्या मधोमध आला होता, पण क्षेत्ररक्षण करणाऱ्या बुमराहचा पाय घसरला. तो चेंडू थ्रो करणार त्याआधी पुकोव्हस्की पुन्हा क्रीजवर परतला.