अहमदाबाद : दडपणाच्या स्थितीत इंग्लंडविरुद्ध सरशी साधल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ शनिवारी येथे होणाऱ्या पाचव्या व अखेरच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत विजय मिळवीत मालिका जिंकण्यास उत्सुक आहे. त्याचसोबत विश्वचषक स्पर्धेसाठी भारत मुख्य संघाची रणनीती तयार करण्याच्या दिशेने मजबूत पाऊल टाकण्यासाठी प्रयत्नशील राहील. भारताने आतापर्यंत मालिकेत आक्रमक रणनिती आखली आहे. पाचव्या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी त्यांची तयारी योग्य दिशेने सुरू आहे. विश्वचषक स्पर्धा याच वर्षाच्या शेवटी भारतात खेळली जाणार आहे. (INDvsENG T-20: India-England decisive match today)
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ यापूर्वी अशा प्रकारच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यात अपयशी ठरत होता; पण आता त्यांना ईशान किशन व सूर्यकुमार यादवच्या रूपाने शानदार खेळाडू गवसले आहेत. या दोघांनी शानदार खेळी करीत संघासाठी नवे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. सूर्यकुमारने गुरुवारी केलेल्या खेळीमुळे कोहलीही आश्चर्यचकित झाला होता. या फलंदाजाला यानंतर एकदिवसीय संघातही स्थान मिळाले आहे. किशन व सूर्यकुमारने आपल्या पदार्पणाच्या मालिकेत छाप सोडली असताना हरियाणाचा अष्टपैलू राहुल तेवतिया संघात समावेश असलेला एकमेव असा खेळाडू आहे की ज्याला अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. शनिवारी त्याला त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळू शकते. भारतासाठी या मालिकेत आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे हार्दिक पांड्याचे गोलंदाजीतील योगदान ठरले आहे. गुरुवारी त्याने चार षटकांत केवळ १६ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले होते. युझवेंद्र चहलच्या स्थानी निवड झालेल्या लेग स्पिनर राहुल चहरनेसुद्धा चांगली गोलंदाजी केली; पण वॉशिंग्टन सुंदरला मात्र छाप सोडता आली नाही.
आघाडीच्या फळीतील लोकेश राहुलचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय आहे. त्याने पहिल्या तीन लढतींत एक, शून्य व शून्य असा स्कोअर केला होता आणि चौथ्या सामन्यात त्याला १४ पेक्षा पुढे मजल मारता आली नाही. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत सन्मानजक मजल मारल्यानंतर दवाच्या पार्श्वभूमीवर त्याचा बचाव करण्यात यशस्वी मिळवल्याने कोहली समाधानी असेल.
दुसरीकडे, पाहुण्या इंग्लंड संघाला जोस बटलर व जागतिक क्रमवारीतील अव्वल फलंदाज डेव्हिन मलान यांच्याकडून कामगिरीत सातत्य अपेक्षित आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर व मार्क वुड यांनी छाप सोडली; पण त्यांना क्रिस जॉर्डनकडून अपेक्षित साथ लाभली नाही.
...आणि विराट भडकला
सूर्यकुमार यादवला वादग्रस्त झेलबाद दिल्याप्रकरणी कर्णधार विराट कोहली चांगलाच भडकला. ज्या क्षेत्ररक्षकाने हा झेल टिपला त्याला स्वत:ला चेंडू जमिनीवर लागल्यानंतर हातात आला की काय याबद्दल खात्री नव्हती. मैदानी पंचाने कुठलीही खात्री न करता सहजपणे बाद ठरवलेच कसे? हा विराटचा प्रश्न होता.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, दीपक चहर, राहुल चहर, राहुल तेवतिया, ईशान किशन.
इंग्लंड : इयोन मोर्गन (कर्णधार),
जोस बटलर, जेसन रॉय, लियाम लिविंगस्टोन, डेव्हिन मलान, बेन स्टोक्स, मोइन अली, आदिल राशीद, रीस टॉपले, क्रिस जॉर्डन, मार्क वुड, सॅम कुरेन, टॉम कुरेन, सॅम बिलिंग्स, जॉनी बेयरस्टो, जोफ्रा आर्चर.
Web Title: INDvsENG T-20: India-England decisive match today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.