भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील महिला क्रिकेट संघांच्या वन डे मालिकेत भारतीय संघाने बाजी मारली. तिसऱ्या वन डे सामन्यात भारताने 6 विकेट राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली. वेस्ट इंडिजच्या 194 धावांचा पाठलाग भारतीय महिलांनी 42.1 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. दुखापतीमुळे काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या स्मृती मानधनानं या सामन्यात धमाकेदार खेळी केली. स्मृतीच्या येण्यानं जेमिमा रॉड्रीग्जची बॅटची चांगलीच तळपली.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 194 धावांत माघारी परतला. कर्णधार स्टेफनी टेलरने 112 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून सर्वाधिक 79 धावा केल्या. तिला सॅसी-अॅन किंग ( 38) आणि हॅली मॅथ्यूज ( 26) यांनी साथ दिली. भारताकडून झुलन गोस्वामी व पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन, तर शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.