INDW vs AUS W (Marathi News) : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात आजपासून कसोटी सामन्याला सुरुवात झाली. पूजा वस्त्राकर ( ४-५३), स्नेह राणा ( ३-५६) व दीप्ती शर्मा ( २-४५) यांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१९ धावांवर गडगडला. भारतीय महिलांनी पहिल्या दिवसअखेर १ बाद ९८ धावांचे प्रत्युत्तर दिले. शफाली वर्मा ( ४०) ने स्फोटक सुरुवात करून दिली. स्मृती मानधना ४३ धावांवर नाबाद आहे. पण, या सामन्यात कसोटी क्रिकेट इतिहासात ६२ वर्षांत जे कधीच घडले नव्हते ते घडले..
ऑस्ट्रेलियाचा महिला संघ ३९ वर्षांनंतर भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी आला. कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना त्यांच्या ओपनर्सकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. पण घडले उलटेच. बेथ मूनी व फोएबे लिचफिल्ड ( Phoebe Litchfield ) यांची जोडी पहिल्याच षटकात तुटली. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लिचफिल्ड डायमंड डकवर ( एकही चेंडूचा सामना न करता) रन आऊट झाली. महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात शून्यावर धावबाद होणारी ती चौथी सलामीवीर आणि १९६१ नंतरची पहिली फलंदाज ठरली.
इंग्लंडची मेरी टेलर १९३७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शून्यावर बाद होणारी पहिली महिला खेळाडू ठरली होती. दोन दशकांनंतर न्यूझीलंडची जॉयस पॉवेल ( वि. इंग्लंड) आणि ऑस्ट्रेलियासाठी १९६१ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात किट रेमंड अशा पद्धतीने बाद झाली होती. रेणुका सिंग ठाकूरने टाकलेल्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लिचफिल्ड बाद झाली. एक धाव घेण्यासाठी लिचफिल्ड पळाली, परंतु जेमिमा रॉड्रिग्जने चपळाईने चेंडू टिपला आणि यष्टिरक्षक यास्तिका भाटियाकडे फेकला. तिने लगेच बेल्स उडवल्या आणि लिचफिल्ड रन आऊट झाली.