INDW vs AUSW 1st ODI Live | मुंबई : कसोटी सामना जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाला वन डे मालिकेतील सलामीच्याच सामन्यात संघर्ष करावा लागला. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला. पण, जेमिमा रॉड्रिग्जने सावध खेळी करून भारताची धावसंख्या २५० पार नेली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताला सुरूवातीलाच तीन मोठे धक्के बसले. शेफाली वर्मा (१), रिचा घोष (२१) बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरला (९) बाद करण्यात पाहुण्या संघाला यश आले. पण, यास्तिका भाटियाने ४९ धावांची खेळी करून डाव सावरला.
यास्तिका बाद झाल्यानंतर मूळची मुंबईची असलेल्या जेमिमाने चमकदार कामगिरी केली. तिने सात चौकारांच्या मदतीने ७७ चेंडूत ८२ धावा कुटल्या. जेमिमाच्या खेळीच्या जोरावर भारताला सन्मानजनक आव्हान उभारण्यात यश आले. जेमिमाशिवाय पूजा वस्त्राकरने आज फलंदाजीत कमाल केली. तिने अखेरच्या काही षटकांमध्ये स्फोटक खेळी करून कांगारूंचा समाचार घेतला. खरं तर आजच्या सामन्यातील पहिला षटकार देखील पूजाच्याच बॅटमधून आला. पूजा वस्त्राकरने ४६ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावा केल्या. भारताने निर्धारित ५० षटकांत ८ बाद २८२ धावा केल्या असून पाहुण्या संघासमोर विजयासाठी २८३ धावांचे आव्हान आहे. आज टीम इंडिया उपकर्णधार स्मृती मानधनाच्या अनुपस्थित मैदानात आहे. आजच्या सामन्यातून साइका इशाक भारतीय संघात पदार्पण करत आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली. ॲश गार्डनर आणि जॉर्जिओ वेयरहॅम यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले, तर डार्सी ब्राउनस, मेगन स्कट, एन्नाबेल सदरलंड आणि अलाना किंग यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
आजजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया, रिचा घोष, स्नेह राणा, अनजोत कौर, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, साइका इशाक, रेणुका सिंग.
दरम्यान, अलीकडेच टीम इंडियाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला कसोटी सामन्यात पराभूत केले. त्यामुळे साहजिकच हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला. पण, कांगारूंनी अनेकदा मोठ्या व्यासपीठावर टीम इंडियाला पराभूत करून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे आपला विजयरथ कायम ठेवण्याचे आव्हान भारतासमोर असेल. वन डे मालिकेनंतर भारतीय संघ नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे.
Web Title: INDW vs AUSW 1st ODI India set Australia a target of 283 for win, Jemimah Rodrigues scored 83 and Pooja Vastrakar scored 62
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.