INDW vs AUSW (Marathi News) : भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात पकड घेतली आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाची दुसऱ्या डावात ५ बाद २३३ धावा अशी अवस्था झाली आहे आणि ते अजूनही ४६ धावांनी पिछाडीवर आहेत. या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur ) आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिली ( Alyssa Healy ) यांच्यात वाद झालेला पाहायला मिळाला. हरमनने अम्पायरचा जाब विचारला, पण तिला हवा तसा निर्णय मिळाला नाही आणि पुढच्याच चेंडूवर....
पूजा वस्त्राकर ( ४-५३), स्नेह राणा ( ३-५६) आणि दीप्ती शर्मा ( २-४५) यांच्या भेदक माऱ्याने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१९ धावांत गुंडाळला. त्यानंतर दीप्ती शर्मा ( ७८), स्मृती मानधना ( ७४), जेमिमा रॉड्रिक्स ( ७३), रिचा घोष ( ५२), पूजा वस्त्राकर ( ४७) व शफाली वर्मा ( ४०) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने ४०६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावाची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. सलामीवीर फोबे लिचफिल्ड ( १८) हिला रिचा घोषने त्रिफळाचीत केले. बेथ मूनी ब्रेन फेड म्हणजेच स्मृती भ्रंशचा शिकार ठरली.
३३ धावांवर खेळणारी बेथ मूनी भारतातील पहिल्या अर्धशतकापासून १७ धावांनी दूर होती. ११.५ व्या षटकात सिली पाँईंटला उभ्या असलेल्या रिचा घोषने प्रसंगावधान दाखवला. मूनीला रन आऊट केले. एलिसे पेरी व ताहलिया मॅकग्राथ यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. स्नेह राणाने पेरीला ( ४५) बाद करून ही जोडी तोडली. त्यानंतर मॅकग्राथ व हिली यांनी दमदार खेळ केला. ही जोडी तोडण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत गोलंदाजीला आणि तिने पहिल्याच षटकात मॅकग्राथ ( ७३) त्रिफळाचीत केले.
वानखेडे स्टेडियमवर कसोटीत विकेट घेणारी हरमनप्रीत पाचवी भारतीय कर्णधार ठऱली. यापूर्वी बिशन सिंग बेदी, कपिल देव, शांथा रंगास्वामी आणि सचिन तेंडुलकर यांनी असा पराक्रम केला होता.
कौर व हिली यांच्यात ड्रामा...
८०व्या षटकात हरमनप्रीत गोलंदाजीला आली. तिन स्ट्राइकवर असलेल्या हिलीला रन आऊट करण्यासाठी चेंडू ऑसी कर्णधाराच्या दिशेने फेकला. पण, हिलीने शरीरावर येणारा चेंडू रोखण्यासाठी बॅड आडवी केली. हरमनप्रीतने obstructing the field नियमानुसार अम्पायरकडे हिली बाद असल्याचे अपील केले. पण, अम्पायरने तिला नाबाद दिले. मात्र, पुढच्याच चेंडूवर हरमनप्रीतने ३२ धावांवर खेळणाऱ्या हिलीला पायचीत करून माघारी पाठवले.
Web Title: INDW vs AUSW : Harmanpreet Kaur appeals for obstructing the field as Alyssa Healy in trying to protect herself used her bat, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.