AUSW vs INDW : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा अ संघ जाहीर केला आहे. मजुराची लेक, आदिवासी कुटुंबातून आलेली मिन्नू मणीला या दौऱ्यावर भारतीय संघाची धुरा सांभाळेल. ट्वेंटी-२०, वन डे आणि एक कसोटी सामना खेळण्यासाठी भारताची युवा ब्रिगेड सज्ज आहे. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात ७ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट या दरम्यान सामने खेळवले जातील. टीम इंडिया तीन ट्वेंटी-२०, तीन वन डे आणि एक कसोटी सामना खेळेल.
भारतीय संघ - मिन्नू मणी (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), प्रिया पुनिया, शुभ सथीश, तेजल हसबनीस, किरण नवगिरे, संजना सजीवन, उमा चेत्री, शिप्रा गिरी, राघवी बिश्त, सायका इशाक, मन्नत कश्यप, तनुजा कनवर, प्रिया मिश्रा, मेघना सिंग, सायली सातघरे, शबनम शकील (फिटनेसवर अवलंबून), एस यशश्री.
राखीव खेळाडू - सायमा ठाकूर
ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक -ट्वेंटी-२० मालिका - ७ ऑगस्ट - पहिला सामना९ ऑगस्ट - दुसरा सामना११ ऑगस्ट - तिसरा सामना
वन डे मालिका -१४ ऑगस्ट - पहिला सामना१६ ऑगस्ट - दुसरा सामना १८ ऑगस्ट - तिसरा सामना
चार दिवसीय सामना - २२ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट
महिला प्रीमिअर लीगमुळे महिला क्रिकेटपटूंना एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. खरे तर महिला प्रीमिअर लीगच्या लिलावात मिन्नू मणीला ३० लाखांची बोली लागल्यानंतर तिने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले होते. "मी माझ्या आयुष्यात ३० लाख रुपये कधीच पाहिले नाहीत. मला आताच्या घडीला कसे वाटते आहे याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत", असे मिन्नूने सांगितले होते. तिला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आपल्या ताफ्यात घेतले
मजुराच्या लेकीची गरूडझेपवायनाड ते महिला प्रीमिअर लीग आणि भारतीय संघ हा प्रवास आदिवासी घरातून आलेल्या मिन्नू मणीसाठी सोपा नव्हता. मिन्नूचे वडील रोजंदारी करून आपल्या मुलीला साथ द्यायचे. मिन्नू १० वर्षांची असताना तिने भाताच्या शेतात आपल्या भावांसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. इयत्ता आठवीपासूनच खेळाला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी ती इडापड्डी येथील सरकारी शाळेत शिकत होती. शाळेच्या शारीरिक शिक्षण शिक्षिका अलसम्मा बेबी यांनी प्रथम मिन्नूची प्रतिभा ओळखली आणि तिला वायनाड जिल्ह्याच्या १३ वर्षांखालील संघाच्या निवड चाचणीसाठी नेले. पण मिन्नूच्या वडिलांनी क्रिकेट खेळण्यास विरोध केला. कालांतराने मिन्नूच्या जिद्दीने वडिलांचे मन जिंकले आणि त्यांनी तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.