INDW vs AUSW: "हे सगळं काही तुमच्यामुळेच होत आहे...", स्मृती मानधनाने चाहत्यांना केले खास आवाहन

सध्या भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 12:40 PM2022-12-12T12:40:23+5:302022-12-12T12:41:02+5:30

whatsapp join usJoin us
 INDW vs AUSW Indian women's team captain Smriti Mandhana has urged fans to come here and watch the match  | INDW vs AUSW: "हे सगळं काही तुमच्यामुळेच होत आहे...", स्मृती मानधनाने चाहत्यांना केले खास आवाहन

INDW vs AUSW: "हे सगळं काही तुमच्यामुळेच होत आहे...", स्मृती मानधनाने चाहत्यांना केले खास आवाहन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : सध्या भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्यात कांगारूच्या संघाने विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात यजमान संघाने विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. खरं तर सुपर ओव्हरमधील अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय महिलांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 4 धावांनी पराभव केला. भारताच्या विजयाची हिरो ठरली मराठमोळी स्मृती मानधना. तिने 49 चेंडूत 79 धावांची खेळी करून सामना बरोबरीत सोडवण्यात मोलाची भूमिका पार पाडली. नंतर सुपर ओव्हरमध्ये स्मृतीने 3 चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 13 धावा काढल्या. लक्षणीय बाब म्हणजे या मालिकेतील सर्व सामने सर्वसामान्यांना देखील स्टेडियमवर मोफत पाहता येणार आहेत. 

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करून 20 षटकांत 1 बाद 187 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 20 षटकांत 5 बाद 187 धावा केल्या. त्यामुळे धावसंख्या बरोबरीची झाली आणि सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवावी लागली. सुपर ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर भारताच्या रिचा घोषने षटकार ठोकला तर दुसऱ्या चेंडूवर ती बाद झाली. भारताकडून तिसऱ्या चेंडूचा सामना कर्णधार हरमनप्रीत कौरने केला आणि 1 धाव काढून स्मृतीला फलंदाजीची संधी दिली. मानधनाने याचा पुरेपुर फायदा घेत आपल्या पहिल्याच चेंडूवर चौकार नंतर एक षटकार आणि अखेरच्या चेंडूवर 3 धावा काढल्या. भारताने सुपर ओव्हरमध्ये कांगारूसमोर विजयासाठी 21 धावांचे आव्हान ठेवले होते. 

स्मृती मानधनाने केले खास आवाहन 
अशातच भारताच्या विजयाची हिरो ठरलेल्या मराठमोळ्या स्मृती मानधनाने चाहत्यांना एक खास आवाहन केले आहे. "तुम्ही सगळे जण इथे आलात आणि प्रेम दिले, तुमच्यामुळेच हे सर्व काही होत आहे. इथून पुढे देखील येत राहा आणि पाठिंबा देत राहा", अशा शब्दांत स्मृतीने भारतीय चाहत्यांचे आभार मानले. 

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. त्यानंतर कांगारूच्या संघाची कर्णधार एलिसा हिली हिने ऑस्ट्रेलियन संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. पण दीप्ती शर्माने हिलीला 25 धावांवर बाद करून पाहुण्या संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर मात्र भारताला गोलंदाजीत आणखी यश मिळाले नाही. बेथ मुनी (54 चेंडूत नाबाद 82 धावा) आणि ताहिला मॅकग्रा (51 चेंडूत नाबाद 70 धावा) यांनी दुसऱ्या बळीसाठी अभेद्य 158 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत 187 धावांपर्यंत मजल मारून दिली

भारताचा दणदणीत विजय 
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या बळीसाठी 8.4 षटकात 76 धावांचा झंझावाती सलामी दिली. मात्र शेफाली वर्मा (34) आणि जेमिमा रॉड्रिक्स (4) या पाठोपाठ बाद झाल्याने भारताचा डाव अडचणीत आला. त्यानंतर स्मृतीने आपले अर्धशतक पूर्ण करताना हरमनप्रीत कौरसोबत 61 धावांची भागीदारी करत भारतीय संघाचे आव्हान कायम ठेवले. हरमनप्रीत (21) आणि स्मृती मंधाना (49 चेंडूत 79 धावा) या पाठोपाठच्या षटकात बाद झाल्याने भारताचा डाव अडखळला. मात्र रिचा घोष (नाबाद 26) आणि देविका वैद्य (नाबाद 11) यांनी भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. अखेरीस शेवटच्या चेंडूत 5 धावांची गरज असताना देविकाने चौकार ठोकत भारताला सामन्यात बरोबरी साधून दिली.

ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघ - 
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, अंजली सरवाणी, देविका वैद्य, एस मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल.

नेट गोलंदाज - मोनिका पटेल, अरुंधती रेड्डी, एसबी पोखरकर, सिमरन बहादूर. 

टी-20 मालिकेचे वेळापत्रक

  1. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 9 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून 
  2. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 11 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून 
  3. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 14 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
  4. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 17 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
  5. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 20 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title:  INDW vs AUSW Indian women's team captain Smriti Mandhana has urged fans to come here and watch the match 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.