CWG 2022, Indian Women vs Australian Women : १५५ धावांचे लक्ष्य उभे केल्यानंतर भारतीय गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर ( Renuka Singh Thakur ) हिने ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीला हादरवून टाकले. ५ बाद ४९ अशी दयनीय अवस्था झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ कमबॅक करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण, एश्लेघ गार्डनर ( Ashleigh Gardner ) हिने एकहाती सामना फिरवला... ग्रेस हॅरीसने ३७ धावांची खेळी करून ऑसींचा डाव सावरला. त्यानंतर गार्डनरने एलाना किंगसोबत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली आणि अश्यक्यप्राय विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्स व ६ चेंडू राखून हा सामना जिंकला.
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur )हिने CWG2022 मध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान पटकावला. शेफाली वर्मानेही ४८ धावांची वादळी खेळी केली. ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक एलिसा हिली ( Alyssa Healy) हिने या सामन्यात मोठा विक्रम केला. तिने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये यष्टिंमागे १०० बळी टिपण्याचा पराक्रम करताना महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) विक्रम मोडला. या फॉरमॅटमध्ये १०० बळी घेणारी ती पहिली खेळाडू ठरली.
स्मृती मानधना ( २४) व शेफाली यांनी चांगली सुरूवात करून दिली खरी, परंतु डार्सिए ब्राऊनने ही जोडी तोडली. यास्तिका भाटिया ( ८) व शेफाली यांच्यातला ताळमेळ चुकला अन् ऑसींना आयती विकेट मिळाली. जेमिमान रॉड्रिक्सही ११ धावा करून बाद झाली. शेफाली ३३ चेंडूंत ९ चौकारांसह ४८ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने मोर्चा सांभाळला. तिने ३४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या. मिगन शटने तिची विकेट घेतली. भारताने ८ बाद १५४ धावा केल्या. इंग्लंडमधील ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारतीय महिलांची ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी त्यांनी २०२१मध्ये इंग्लंडविरुद्ध ६ बाद १५३ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या जेस जॉनासेनने २२ धावांत ४ विकेट्स घेतल्या.