INDW vs AUSW T20 Series | नवी मुंबई: तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवून यजमान भारताने विजयी सलामी दिली होती. पण, दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांना साजेशी खेळी करण्यात अपयश आलं. दीप्ती शर्मा (३०) वगळता एकाही फलंदाजाला सन्मानजनक धावा करता आल्या नाहीत. भारतीय महिला संघ मायदेशात ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर ही मालिका खेळवली जात आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत ८ बाद १३० धावा केल्या. या सोप्या आव्हानाचा कांगारूंनी सहज पाठलाग केला आणि मालिकेत बरोबरी साधली. पाहुण्या ऑस्ट्रेलियानं १९ षटकांत ४ विकेट गमावून लक्ष्य गाठलं. पराभवानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं संघाच्या चुकांबद्दल भाष्य केलं आहे.
फलंदाजांवर फोडलं पराभवाचं खापर हरमननं पराभवाचं खापर भारतीय फलंदाजांवर फोडलं. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्याची गरज होती. मात्र, फलंदाजांना साजेशी खेळी करण्यात अपयश आल्यानं मालिका जिंकण्याची संधी हुकली. "मला वाटतं की, आम्ही अपेक्षित धावसंख्या उभारली नाही. मात्र, गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आम्ही सामना १९व्या षटकापर्यंत खेचला, जी एक चांगली बाब आहे. पहिल्या सामन्यात आमचं एकतर्फी वर्चस्व होतं. या सामन्यांमध्ये आमच्या क्षेत्ररक्षणात सुधारणा केली आहे", असं हरमनप्रीत कौरनं नमूद केलं. खरं तर हरमननं पराभवाचं खापर श्रेयांका पाटीलवर फोडताच नेटकऱ्यांनी तिच्यावर सडकून टीका केली.
ऑस्ट्रेलियानं सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली होती का? असं विचारलं असता हरमननं सांगितलं, "आम्हाला ती संधी तयार करायची होती... १९व्या षटकात श्रेयांका पाटीलनं चांगला चेंडू टाकला असता तर फरक पडला असता. कारण फुल टॉस चेंडूवर एलिसे पेरीनं चौकार मारला. आम्ही या आधी देखील अशा सामन्यांचे साक्षीदार राहिलो आहोत. मात्र प्रत्येकवेळी संघातील सहकारी बदलत असतात. हा युवा वर्ग सकारात्मक असून अनुभव येताच सुधारणा होत जाईल."