INDW vs AUSW T20 Series | नवी मुंबई: भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिका खेळत आहेत. एकमेव कसोटी सामना जिंकल्यानंतर वन डे मालिकेत मात्र यजमानांच्या हाती निराशा लागली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिन्ही वन डे सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. आता भारतीय महिला ट्वेंटी-२० मालिकेत कांगारूंशी भिडणार आहेत. तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका ५ तारखेपासून खेळवली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
वन डे मालिकेतील दारूण पराभवानंतर हरमनप्रीत कौरच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. एक कर्णधार म्हणून हरमनला यश आले असले तरी मागील काही सामन्यांपासून भारतीय कर्णधाराची बॅट शांत आहे. हरमनप्रीत कौरने रणनीती सांगताना म्हटले, "एक क्रिकेटपटू म्हणून आम्ही जरी आंतरराष्ट्रीय सामने खेळत नसलो तरी आम्ही सराव करत असतो. सराव करणे कधी बंद होत नाही, त्यामुळे मला वाटत नाही की हल्ली आम्ही जास्त क्रिकेट खेळत आहोत. कारण अनेकांना वर्कलोड संबंधित प्रश्न पडले आहेत. पण, मागील महिनाभरात आम्ही विविध फॉरमॅटमध्ये खेळलो आहोत. वन डे मालिकेचा अपवाद वगळता कसोटी सामन्यांमध्ये संघाने चांगली कामगिरी केली."
तसेच मागील काही काळापासून बर्याच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे मला वाटत नाही की एक खराब मालिका संघाच्या खेळीवर परिणाम करेल. मी नुकतीच सर्व खेळाडूंशी चर्चा केली आणि प्रत्येकजण खूप सकारात्मक दिसत आहे. सगळे खेळाडू ट्वेंटी-२० मोडमध्ये आहेत आणि ही मालिका आमच्यासाठी किती महत्त्वाची आहे याबद्दल उत्सुक आहेत, असेही हरमनप्रीत कौरने सांगितले.
भारताचा ट्वेंटी-२० संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, श्रेयांका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकार, कनिका आहुजा, मिन्नू मणी.
ट्वेंटी-२० मालिका (सर्व सामने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर)५ जानेवारी - सायंकाळी ७ वाजल्यापासून ७ जानेवारी - दुपारी दीड वाजल्यापासून९ जानेवारी - दुपारी दीड वाजल्यापासून