INDW vs AUSW Test (Marathi News) : भारतीय महिला संघाने कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध मजबूत पकड घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या २१९ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४०६ धावांचा डोंगर उभा केला. भारताने पहिल्या डावात १८८ धावांची आघाडी घेतली आणि ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दोन विकेट्स गमावल्या आहेत आणि त्यांची सलामीवीर बेत मूनीला ( Beth Mooney ) स्मृती भ्रंश झाल्याचे पाहायला मिळाले.
पूजा वस्त्राकर ( ४-५३), स्नेह राणा ( ३-५६) आणि दीप्ती शर्मा ( २-४५) यांच्या भेदक माऱ्याने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१९ धावांत गुंडाळला. त्यानंतर दीप्ती शर्मा ( ७८), स्मृती मानधना ( ७४), जेमिमा रॉड्रिक्स ( ७३), रिचा घोष ( ५२), पूजा वस्त्राकर ( ४७) व शफाली वर्मा ( ४०) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने ४०६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावाची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. सलामीवीर फोबे लिचफिल्ड ( १८) हिला रिचा घोषने त्रिफळाचीत केले. बेथ मूनी ब्रेन फेड म्हणजेच स्मृती भ्रंशचा शिकार ठरली.
३३ धावांवर खेळणारी बेथ मूनी भारतातील पहिल्या अर्धशतकापासून १७ धावांनी दूर होती. ११.५ व्या षटकात सिली पाँईंटला उभ्या असलेल्या रिचा घोषने प्रसंगावधान दाखवला. मूनीने पुढे येऊन मारलेला चेंडू रिचाच्या हाती गेला. यावेळी क्रिजवर बॅट टेकवायची सोडून मूनी आरामात दिसली आणि हिच संधी साधून रिचाने चेंडू स्टम्पवर फेकला. मूनी बॅट टेकवण्याच्या आधीच बेल्स उडाल्या आणि ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला.