indw vs ausw test | मुंबई : मोठ्या कालावधीनंतर भारतात ऑस्ट्रेलियाचा महिला संघ कसोटी सामना खेळत आहे. आजपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याला सुरूवात झाली. आयसीसी स्पर्धांसह द्विपक्षीय मालिकेत वर्चस्व असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय संघाने मोठे आव्हान दिले. खरं तर ऑस्ट्रेलियन संघाने अनेकदा मोठ्या व्यासपीठावर भारताचा पराभव केला आहे. मात्र, आज चित्र काहीसे वेगळे दिसले अन् भारताने पहिल्यादिवसाअखेर मजबूत पकड बनवली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या ऑस्ट्रेलियाने ७७.४ षटकांत सर्वबाद केवळ २१९ धावा केल्या. पाहुणा संघ लवकर बाद झाल्यानंतर यजमानांना पहिल्याच दिवशी पुरेशी फलंदाजी करण्याची संधी मिळाली.
पहिल्या दिवसाअखेर भारत मजबूत स्थितीत असून टीम इंडियाने १९ षटकांत १ विकेट गमावून ९८ धावा केल्या. उपकर्णधार स्मृती मानधना (४३) आणि स्नेह राणा (४) धावांसह खेळपट्टीवर टिकून आहे. सलामीवीर शेफाली वर्माने चांगली सुरूवात केली पण ४० धावांवर असताना ती जेस जोन्सानची शिकार झाली. शेफाली आणि स्मृतीने पहिल्या बळीसाठी ९० धावांची भागीदारी नोंदवली. भारत दिवसाअखेर १२१ धावांनी पिछाडीवर असला तरी मजबूत स्थितीत आहे. शुक्रवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्फोटक खेळी करून दबाव टाकण्याच्या प्रयत्नात टीम इंडिया असेल.
ऑस्ट्रेलियाच पहिला डाव
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधार ॲलिसा हिलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, पहिल्याच षटकापासून कांगारूंची डोकेदुखी वाढली. चांगल्या लयनुसार खेळत असलेल्या बेथ मूनीला (४०) पूजा वस्त्राकरने बाहेरचा रस्ता दाखवला. फोएबे लिचफिल्डला खातेही उघडता आले नाही अन् ती जेमिमा रॉड्रिग्जकडून धावबाद झाली. त्यानंतर पूजा वस्त्राकरने एलिसे पेरीचा त्रिफळा काढून ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका दिला. मग टहली मॅकग्राने अर्धशतकी खेळी करून कांगारूंचा डाव सावरला. तिच्या व्यतिरिक्त किम गार्थने २८ धावा केल्या अन् ती नाबाद परतली. भारताकडून पूजा वस्त्राकरने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर स्नेह राणा (३) आणि दीप्ती शर्माला (२) बळी घेण्यात यश आले.
Web Title: INDW vs AUSW test match Australia all out for 219 runs, Pooja Vastrakar took 4 wickets and Deepti Sharma took 3 wickets, Smriti Mandhana is unbeaten on 43 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.