INDW vs AUSW Live | मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला कसोटी सामन्यात पराभवाची धूळ चारली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने (India Women vs Australia Women) इतिहास रचला. अनेकदा मोठ्या व्यासपीठावर कांगारूंनी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारताला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आयसीसी स्पर्धांसह द्विपक्षीय मालिकेत वर्चस्व असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय संघाने मोठे आव्हान देत विजय साकारला. चौथ्या दिवशी अवघ्या ७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत यजमान संघाने ही किमया साधली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ७७.४ षटकांत सर्वबाद केवळ २१९ धावा केल्या होत्या. पाहुणा संघ लवकर बाद झाल्यानंतर यजमानांना पहिल्याच दिवशी पुरेशी फलंदाजी करण्याची संधी मिळाली. पहिल्या दिवसापासूनच भारत मजबूत स्थितीत होता, टीम इंडियाने पहिल्या दिवसाअखेर १९ षटकांत १ विकेट गमावून ९८ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१९ धावा केल्यानंतर भारतीय संघाने ४०६ धावांचा डोंगर उभारला. भारताकडून पहिल्या डावात शेफाली वर्मा (४०), स्मृती मानधना (७४), रिचा घोष (५२), जेमिमा रॉड्रिग्ज (७३), पूजा वस्त्राकर (४७) आणि दीप्ती शर्माने (७८) धावा केल्या. टीम इंडियाच्या सांघिक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने सर्वबाद ४०६ धावा केल्या. यासह भारताने १८७ धावांची मजबूत आघाडी घेतली.
भारताचा दणदणीत विजय
दुसऱ्या डावात देखील ऑस्ट्रेलियन फलंदाजांना कमाल करता आली नाही. दुसऱ्या डावात कांगारूंकडून तहलिए मॅकग्राने सर्वाधिक (७३) धावा केल्या, तर एलिसे पेरीने (४५) धावा केल्या. पाहुणा संघ दुसऱ्या डावात केवळ २६१ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघाकडे १८७ धावांची आघाडी होती अन् ऑस्ट्रेलियन संघ केवळ २६१ धावांत आटोपला. त्यामुळे यजमान भारतीय संघाला विजयासाठी केवळ ७४ धावांची आवश्यकता होती. ७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १८.४ षटकांत लक्ष्य गाठून ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. दुसऱ्या सत्रातच भारताला विजय मिळवण्यात यश आले.
भारताचा पहिला डाव -
शेफाली वर्मा - ४० धावा
स्मृती मानधना - ७४ धावा
रिचा घोष - ५२ धावा
जेमिमा रॉड्रिग्ज - ७३ धावा
दीप्ती शर्मा - ७८ धावा
पूजा वस्त्राकर - ४७ धावा
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव उद्ध्वस्त करण्यात भारताच्या पूजा वस्त्राकरने मोलाची भूमिका बजावली. पूजाने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर स्नेह राणाला (३) आणि दीप्ती शर्माला (२) बळी घेण्यात यश आले.
भारताचा दुसरा डाव -
शेफाली वर्मा - ४ धावा
स्मृती मानधना - ३४ नाबाद
रिचा घोष - १३
जेमिमा रॉड्रिग्ज - १२ नाबाद
ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात देखील निराशाजनक कामगिरी केली. भारतीय फलंदाजांनी कमाल केल्यानंतर गोलंदाजांनीही आपली जबाबदारी चोख पार पाडली. भारताकडून स्नेह राणाने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर राजेश्वरी गायकवाड आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. याशिवाय पूजा वस्त्राकरने एक बळी घेऊन सामन्यात पाच बळी घेण्याची किमया साधली.
Web Title: INDW vs AUSW Test Match Team India led by Harmanpreet Kaur beat Australia by 8 wickets, Sneh Rana took 7 wickets and Pooja Vastrakar took 5 wickets, Smriti Mandhana and Deepti Sharma played superbly
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.