Join us  

Jay Shah, INDw vs AUSw:  "मुलींनो, तुम्ही योद्ध्याप्रमाणे लढलात, आम्ही सारे जण..."; जय शाहांचं मनं जिकणारं ट्वीट

भारतीय महिलांचा सेमीफायनलमध्ये अवघ्या ५ धावांनी पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 1:25 PM

Open in App

Jay Shah reaction on INDw vs AUSw: महिला T20 विश्वचषक २०२३चा उपांत्य फेरीत भारताला ५ धावांनी अतिशय जिव्हारी लागणाऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. केपटाऊन येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून जेमिमा रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर या दोघींनी निकराची झुंज दिली पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. दमदार कामगिरी करूनही हाता-तोंडाशी आलेला घास ऑस्ट्रेलियाने हिरावून नेला. त्यामुळे कर्णधार हरमनप्रीत कौरसह सारेच नाराज दिसून आले. पण बीसीसीआय सचिव जय शाह यांनी महिला संघाला धीर दिला.

"भारतीय महिला संघाने अतिशय चांगली झुंज दिली पण दु्र्दैवाने त्यांचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने टी२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये चांगला खेळ केला, त्यामुळे भारत पराभूत झाला. पण असं असलं तरी आम्हाला आमच्या भारतीय महिला संघाचा नक्कीच अभिमान आहे. मैदानावर भारताच्या कन्या ज्या पद्धतीने झुंज देताना दिसल्या त्यासाठी आम्हाला त्यांचा गर्व वाटतो. आपल्या मुलींनी सर्वस्व पणाला लावलं आणि एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढल्या. मुलींनो, आम्ही सारे तुमच्या सोबत आहोत," अशा शब्दांत जय शाह यांनी ट्वीट करत भारतीय संघाला धीर दिला आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. संघातर्फे बेथ मुनीने अर्धशतक झळकावले. तिने ३७ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. तर मेग लॅनिंगनेही ३४ चेंडूत ४९ धावा केल्या. तिने नाबाद खेळी करत ४ चौकार आणि २ षटकार मारले. तर अॅशले गार्डनरने १८ चेंडूत ३१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शेफाली वर्माच्या आणि स्मृती मानधना स्वस्तात बाद झाल्या. काही वेळाने यास्तिका भाटियाही ४ धावांवर बाद झाली. मात्र, जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी चौथ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. जेमिमाच्या ४३ धावा आणि हरमनप्रीत कौरच्या ५२ धावा यामुळे भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. पण अखेरीस भारताला ५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२जय शाहबीसीसीआयहरनमप्रीत कौरभारतीय क्रिकेट संघ
Open in App