INDW vs BANW 1st ODI : बांगलादेशच्या महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करत प्रथमच भारतीय महिला संघाचा वन डे सामन्यात पराभव केला आहे. भारतीय महिला संघ बांगलादेश दौऱ्यावर असून तिथे वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. आज या मालिकेलीत सलामीचा सामना खेळवला गेला. सलामीच्या सामन्यात भारताला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला अन् यजमान संघाने विजयी सलामी दिली.
दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला ४० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारताला डकवर्थ लुईस नियमानुसार लक्ष्य देण्यात आले. पण भारताचा संपूर्ण संघ केवळ ११३ धावांत आटोपला.
बांगलादेशचा ऐतिहासिक विजयतत्पुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान बांगलादेशने ४३ षटकांत सर्वबाद १५२ धावा केल्या होत्या. कर्णधार निगार सुलतानाने ३९ धावांची सर्वाधिक खेळी केली. तर भारताकडून अमनजोत कौरने सर्वाधिक ४ बळी घेतले. भारतीय गोलंदाजांनी सांघिक खेळी करत यजमानांना छोट्या धावसंख्येपर्यंत रोखले. पण १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ३५.५ षटकांत ११३ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक २० धावा केल्या, तर देविका वैद्य नाबाद (१०), प्रिया पुनिया (10), स्मृती मानधना (11), यास्तिका भाटिया (१५), कर्णधार हरमनप्रीत कौर (५) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (१०) धावा करून तंबूत परतली.
बांगलादेशने ऐतिहासिक विजय मिळवत प्रथमच भारताला वन डे मध्ये पराभवाची धूळ चारली. या पराभवानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने म्हटले, "आम्ही चांगली फलंदाजी केली नाही आणि जबाबदारी नीट हाताळली नाही. गोलंदाजीतही आम्हाला फार चांगली कामगिरी करता आली नाही. खरं तर गोलंदाजी आणि फलंदाजीत आम्ही आमच्या क्षमतेनुसार कामगिरी केली नाही. आम्ही यापूर्वी वन डे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे आशा आहे की आम्ही चांगले पुनरागमन करू."